प्रभाग रचना आक्षेपांवर तीन तास सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 12:39 AM2017-01-24T00:39:17+5:302017-01-24T00:39:17+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली.
१२ जणांकडून १४ आक्षेप : विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली सुनावणी
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली. ही प्रभाग रचना नियमाला डावलून करण्यात आल्याचा आरोप करीत प्रभाग रचनेवर शहरातील १२ जणांनी १४ आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांवर सोमवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. ही सुनावणी तब्बल तीन तास चालली.
मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात झालेल्या सुनावणीला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह आरोग्य विभागाचे आयुक्त व्यास, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांची उपस्थिती होती. सर्व आक्षेपकर्त्यांना एक-एक बोलावून त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले. यावेळी आक्षेपकर्त्यांनी नियमाला डावलून प्रभाग रचना केल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यांचे आक्षेप ऐकून घेत विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचनेत योग्य ते बदल करण्याचे आश्वासन आक्षेपकर्त्यांना दिले.
प्रभाग रचना झाल्याच्या घोषणेनंतर आक्षेप स्वीकारने सुरू होते. यात संदीप आवारी, राजकुमार जवादे, संजय वैद्य, दीपक मुळे, राहुुल पावडे, देवानंद वाढई, राजेंद्र आखरे, राजेश मोर्य, जितेद्र क्षीरसागर, हरविंदरसिंह धुन्ना व राजू विट्टूरवार या १२ जणांनी आक्षेप नोंदविले होते. संदीप आवारी, संजय वैद्य व राहुल पावड़े यांनी प्रत्येकी दोन-दोन आाक्षेप नोंदविले होते.
या आक्षेपांवर मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी सुरू झाली. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वत: सर्वांचे आक्षेप ऐकून घेत आवश्यक ठिकाणी बदल करण्याचे आश्वासन दिले. संदीप आवारी यांनी सीमांकन योय रितीने करण्यात आले नाही, असा आक्षेप नोंदविला होता. मोठे रस्ते व नाला किंवा नदीला सीमा ठरविणे आवश्यक होते. मात्र त्यांच्या प्रभागात असे झाले नाही. लहान रस्ते, गल्लीतून वॉर्डाची सीमा ठरविण्यात आली. हे नियमात नाही, असे त्यांनी आक्षेप नोंदविताना सांगितले. भिवापुर वार्ड बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सुनावणीत अधिकाऱ्यांना आक्षेप ऐकवून रचनेत सुधारणा करण्याची मागणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)
कुठे १५ हजार तर कुठे २० हजार मतदार
नगरसेवक संजय वैद्य यांनी सीमांकन योग्य रितीने करण्यात आले नसून मतदार संख्याही लक्षात घेण्यात आली नाही, असा आरोप केला. त्यांनी सांगितले की, शहरातील ५ प्रभागात २० हजार ५०० मतदार आहेत. तर ४ प्रभागामध्ये १९ हजार ५०० ते ७०० मतदार आहेत. ३ प्रभागात १७ हजार ५०० ते ७०० तर दोन प्रभागात १४ हजार ते १५ हजार मतदार आहेत. यामुळे ‘१५ हजारहून अधिक व २१ हजार पेक्षा कमी’ मतदार नियमात सुसंगता दिसून येते, असे सांगितले.
प्रमाणपत्रासाठी येणार अडचणी
नगरसेवक राजेंद्र आखरे यांनी आक्षेप नोंदविताना प्रभाग रचनेत पठाणपुरा प्रभाग तयार करण्यात आले. या प्रभागात २० टक्के क्षेत्र पठाणपुरा व ८० टक्के क्षेत्र भिवापुर वार्डातील क्षेत्राला जोडण्यात आला आहे. मात्र या प्रभागाचे नाव पठाणपुरा ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भिवापुर वार्डातील कोणताही नागरिक आपला रहिवासी प्रमाणपत्र बनविण्यासाठी नगरसेवकाजवळ गेल्यास त्याला पठाणपुरा प्रभागाचा प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे भविष्यात भिवापुर वार्डातील नागरिकांना प्रमाणपत्रासाठी अडचणी येऊ शकतात, असे विभागीय आयुक्तांसमोर सांगितले. याचप्रकारे किल्ला व नदीचा विचार न करता प्रभाग रचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.