रेल्वे क्रॉसिंगवर टिप्पर बिघडल्याने तीन तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:23+5:302021-03-26T04:28:23+5:30
ब्रह्मपुरीतील पेठवार्डजवळचे रेल्वे क्रासिंग ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी शहरातून आरमोरीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर पेठवार्डनजीक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर एक टिप्पर त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या ...
ब्रह्मपुरीतील पेठवार्डजवळचे रेल्वे क्रासिंग
ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी शहरातून आरमोरीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर पेठवार्डनजीक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर एक टिप्पर त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या गतिरोधकावरून खाली उतरत असताना रस्त्याच्या अगदी मध्यभागी नादुरुस्त झाल्याने रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. जवळपास तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सदर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासनतास ताटकळत राहावे लागले आणि मनस्ताप सहन करावा लागला.
सदर रेल्वे क्रॉसिंगवर बसविण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा अधिक असल्याने वारंवार याठिकाणी ट्रक, टिप्पर तसेच जड वाहने नादुरुस्त होतात आणि दिवसभरातून एकदा तरी वाहतुकीची कोंडी याठिकाणी होते. त्यामुळे वाहनचालकांना, परिसरातील नागरिकांना बराच वेळ क्रॉसिंगवर ताटकळत उभे रहावे लागते. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.
मात्र संबंधित विभागाला नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अजिबात चिंता दिसत नाही. रेल्वे क्रॉसिंगवर बसविण्यात आलेल्या गतिरोधकाची जर उंची काही प्रमाणात कमी करण्यात आली तर वारंवार अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन वारंवार याठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
बॉक्स
गतिरोधकाची उंची अधिक
गतिरोधकाची उंची अधिक असल्याने वारंवार याठिकाणी जड वाहने नादुरुस्त होऊन वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या २-३ किमीपर्यंत रांगा लागतात. सदर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शिपायांना पाचारण करावे लागते.
वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.