भरधाव कार रस्त्याच्या खाली उलटली; माय-लेकी जागीच ठार, वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 12:09 PM2021-12-06T12:09:14+5:302021-12-06T12:30:28+5:30
पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
चंद्रपूर : नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी कारने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली पलटली. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमरास पिंपळनेरी-खापरी मार्गावर घडली.
सायत्रा मोतीराम मेश्राम (६५) व कमल चुनारकर (४५, दोघीही रा. खापरी), मोतीराम मेश्राम (७०, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत. तर, उत्तम चुनारकर (४५, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) अशी जखमींची नावे आहेत.
खापरी येथील मेश्राम व चुनारकर यांचे कुटुंब कारने तालुक्यातीलच सरडपार येथे नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, पिंपळनेरी-खापरी मार्गावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरून पलटली. यात सायत्रा मेश्राम व कमल चुनारकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले. मात्र, मोतीराम मेश्राम यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. इतर दोन जखमींवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. विशेष म्हणजे, पिंपळनेरी-खापरी मार्गाचे बांधकाम सुरू आहे. अशातच कार वेगात असल्याने अपघात झाला. या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.