लग्नाच्या तीन महिन्यानंतर तिने मिळविला प्रेमात विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:12+5:302021-09-14T04:33:12+5:30
पळसगाव (पि)(चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील एका प्रेमी युगुलाचा आंतरजातीय विवाह रविवारी सायंकाळी ७ वाजता ...
पळसगाव (पि)(चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील एका प्रेमी युगुलाचा आंतरजातीय विवाह रविवारी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिरामध्ये गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत लावून दिला.
बोथली येथील महेश श्रीराम नागपुरे (२३) आणि शिवानी दिनकर सुकारे (२०) रा. कोजबी ता. नागभीड यांचे मागील दोन वर्षांपासून प्रेम जुळले होते. दोघींची कोजबी गावात पहिली भेट झाली. एका नजरेत दोघेही एकमेकांना आपलेसे करून बसले. प्रेमकथा बहरू लागली. कोजबीला महेशची आत्या राहते. शिवानीला भेटण्यासाठी आत्याच्या बहाण्याने त्याच्या कोजबीला चकरा सुरू झाल्या. या प्रेमाची चुणूक शिवानीच्या घरच्यांना लागली. त्यांनी या प्रेमाला विरोध दर्शवून शिवानीसाठी स्थळ शोधले. अखेर जबरदस्तीने दुसऱ्या मुलाशी शिवानीचे लग्न लावून दिले. आता सर्वांनाच वाटले, हे दोघेही वेगळे झाले. म्हणतात ना, प्रेम आंधळे असते. याचा प्रत्यय येथे आला. सासरी मात्र शिवानीचे मन रमले नाही. अवघ्या तीन महिन्यांनंतर तिने पतीचे घर सोडले आणि थेट महेशच्या घरचा रस्ता पकडला. घरी येताच तिने सर्व प्रकार सांगितला. आता मी आता परत जाणार नाही, माझे जे व्हायचे ते याच घरात होईल, असे तिने महेशच्या कुटुंबाला सांगितले. महेश वा त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ शिवानीच्या सासरच्या मंडळींना हा प्रकार सांगितला. या दोघांच्या प्रेमात अडसर होऊ नका, असे बजावले. तिच्या पतीनेही शिवानीला सोडचिठ्ठी देत कायदेशीर सर्व बाबींतून मुक्त केले. अखेर प्रेम जिंकले. महेश व शिवानीचे पारंपरिक पद्धतीने बोथली येथील हनुमान मंदिर परिसरात कुटुंबीयांच्या समक्ष हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले. सरपंच मनोहर चौधरी, नमिता पाटील ग्रा. पं. सदस्य तानाजी सहारे, माजी उपसरपंच प्यारेखा पठाण, प्रताप नागपुरे, अण्णाजी सहारे, विनोद ढोणे यांच्यासह गावातील मंडळी या लग्नाचे साक्षीदार झाली होती.
130921\img-20210913-wa0176.jpg
गावकऱ्यांनी लावून दिला प्रेमविवाह