बनावट खत विक्रीप्रकरणी आणखी तिघांना अटक
By admin | Published: April 30, 2016 12:49 AM2016-04-30T00:49:47+5:302016-04-30T00:49:47+5:30
तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.
दोन दिवसांची पोलीस कोठडी : यापूर्वी दोघांना झाली होती अटक
ब्रह्मपुरी : तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रकरण दाबल्या गेले. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते व विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण पुन्हा उजेडात आले असून अशोक पंजाबराव दहिकर, शशीकांत प्रभाकर लकडे, माधव प्रभाकर निमकर रा. अमरावती या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाली आहे.
सन २०१३ मध्ये अमरावतीच्या कंपनीने काही गट तयार केले व या परीक्षेत्रातील काही शेतकऱ्यांना पकडून रासायनिक खते असल्याची बतावणी करुन खताची विक्री केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कंपनीविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तत्कालिन कृषी अधिकारी इनायत शेख यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
ब्रह्मपुरीे पोलीस ठाण्याचे तत्कालिन ठाणेदार यांनी कुठलीही चौकशी न करता प्रकरणाचा गाशा गुंडाळला होता. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सदर प्रकरण उचलून धरला होता व विधानसभेत तारांकित प्रश्नावली करण्यास भाग पाडले. त्यानुसार हे प्रकरण २०१५ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले. या शाखेने चार महिन्यापूर्वी गिरीश चालखुरे आणि महेश हरडे या दोन आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत घेतले होते.
अटकेत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूरने अमरावती येथे जावून अशोक पंजाबराव दहिकर, कंपनीचे मालक शशीकांत प्रभाकर लकडे, संचालक माधव प्रभाकर निमकर रा. तिवसा यांना गुरुवारी अटक केली व रात्री ९ वाजता ब्रह्मपुरीच्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीश के.के. चाफले यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण तिघांनाही ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (तालुका प्रतिनिधी)