चंद्रपूरातून तिघेजण नांदेड पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:22 PM2020-05-07T17:22:04+5:302020-05-07T17:22:37+5:30
गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनी परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा संशय आहे. नांदेडचे पथक या तिघांच्या शोधात गुरुवारी चंद्रपूरात आले असता तिघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनी परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा संशय आहे. नांदेडचे पथक या तिघांच्या शोधात गुरुवारी चंद्रपूरात आले असता तिघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या तिघांची नावे मात्र नांदेड येथून पसार झालेल्या कोरोना बाधितांशी जुळत नसल्याने नांदेडचे पथकही संभ्रमात पडले आहे. या तिघांची नांदेड येथे पोहचताच कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, नांदेड येथे २० जणांची एकाचवेळी कोरोना तपासणी केली होती. हा अहवाल येण्यापूर्वीच तिघेजण पसार झाले. अहवालात सर्व २० ही जणांना कोरोनाचे निदान झाले. तेव्हापासून नांदेड पोलीस त्या शोधत आहेत. अशातच बुधवारी सकाळी कोरपना तालुक्यातील माणिकगड (गडचांदूर) सिमेंट कंपनी परिसरात तीन चालक स्नान करीत असतानाचे फोटो काढून हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना बांधित असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल केले. या आधारे नांदेड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून या तिघांना ताब्यात घेऊन विलगीकरण केले. नांदेड पोलिसांचे पथक रुग्णवाहिकेसह आज चंद्रपूरात दाखल झाले. या पथकाच्या प्राथमिक चौकशीत नांदेड येथून पसार झालेल्या तिघांची नावाशी या तिघांशी जुळत नसल्याचे पुढे आले. तरीही खबरदारी म्हणून या तिघांनाही नांदेडला रवाना करण्यात आले. आता या तिघांची नांदेड येथेच कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
सोशल मिडियामुळे संभ्रम - पोलिसांचे ताशेरे
सोशल मिडियावर नांदेड येथून पसार झालेले तीन कोरोनाबाधित चंद्रपूरात आढळल्याची चर्चा व्हायरल झाली. यामुळे जनतेमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल. अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडियावर प्रसारीत करु नये, यावर चंद्रपूर पोलिसांनी ताशेरे ओढले आहे.
सिमेंटची वाहतुक करणाऱ्या चालकांवरच नियंत्रणच नाही
लॉकडाऊनच्या काळातच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सिमेंट उद्योगही सुरू करण्यात आले. या उद्योगातून दररोज सिमेंटच्या बॅग्स ट्रकद्वारे बाहेर जिल्ह्यात नेल्या जात आहे. या माध्यमातून ट्रक चालक आणि क्नीनरचा कोरोनाग्रस्त जिल्ह्यात प्रवास होत आहे. दरम्यान ही मंडळी कोणाच्या संपर्कात येते, कुणाशी भेटते. याची कुठेही नोंद होत नाही. सिमेंट पोहचवून आल्यानंतर ही मंडळी बिनदिक्ततपणे वावरत असतात. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघेजण वेगवेगळ्या ठिकाणचे असून गडचांदूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक असल्याचे समजते. ते नांदेडसह अन्य जिल्ह्यात प्रवास करून आलेले आहेत. अशाचप्रकारे अन्य ट्रक चालकांचा प्रवास सुरू आहे.