मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:39 PM2023-10-18T16:39:39+5:302023-10-18T16:42:14+5:30

पहिल्या टप्प्यातील १० जागांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी

Three planes arriving for the Flying Club at Morwa Airport; An initiative of eight companies | मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार 

मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार 

चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आठ कंपन्यांकडून विमानांची व्यवस्था केली जाणार आहे. सेस्ना कंपनीची (एक इंजिन) दोन विमाने, दोन इंजिनचे एक विमान अशी तीन विमाने मोरवा विमानतळाला मिळणार आहेत. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या प्रगतीचा सोमवारी नियोजन भवनात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, साहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., कॅप्टन इझिलारसन, सहकारी अभियंता सादत बेग, हरीश कश्यप आदी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ६३ लाख तर संरक्षण भिंतीसाठी ११ कोटी ९३ लाख तातडीने मंजूर करण्याच्या सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील १० प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागासप्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश आवर्जून करावा, अशी सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर फ्लाईंग क्लबचा कसा विकास करण्यात येणार, याबाबत बैठकीत सादरीकरण केले.

या आहेत कंपन्या

केंद्र शासनाच्या कोल इंडिया, ओ.एन.जी.सी., इंडियन ऑईल, जे.एन.पी.टी., हिंदुजा, अदानी, टाटा, बिरला आदी उद्योग समूहांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) विमानांची व्यवस्था करणार आहे. त्यासाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

असे आहेत निधीचे टप्पे

धावपट्टीच्या दुरुस्ती- ५ कोटी ६३ लाख

संरक्षण भिंत- ११ कोटी ९३ लाख

दुसऱ्या टप्प्यात हँगर- १० कोटी

फ्रंट कार्यालय- ३७ लाख

ॲप्रोच मार्ग- २ कोटी ५० लाख

विमानतळावर झाले प्रात्यक्षिक

नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर नुकतेच प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. विमानाने टेक ऑफ, लँडिंग व हवाई मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक बाबींचे निरीक्षण केले.

एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी २०० तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करावे लागते. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होणाऱ्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून चंद्रपुरातील मोरवा विमानतळाचा पर्याय उत्तम असून युवक-युवतींना वैमानिक होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री, चंद्रपूर

Web Title: Three planes arriving for the Flying Club at Morwa Airport; An initiative of eight companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.