चंद्रपूर जिल्ह्यात होणार एलआयसीच्या तीन सॅटेलाईट ब्रँच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:49 PM2019-09-14T15:49:51+5:302019-09-14T15:54:42+5:30
ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे.
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘योगक्षेम, वहाम्यहम’, हे घोषवाक्य घेत ‘जीवन के साथ भी,और जीवन के बाद भी’ अशी संकल्पना असलेल्या भारतीय जीवन विमा कंपनीने पूर्ण देशात आपले विम्याचे ग्राहक तयार केले आहेत. आजघडीला लाखो नागरिकांना विमा कंपनीने जीवन सुरक्षाचे कवच पुरविले आहे. याच ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
भारतीय जीवन विम्यामध्ये कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते, विमाधारकाच्या मृत्यूपश्चात कुटूंबप्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्टया त्यांचे जीवन बिघडणार नाही, यासाठी एलआयसी विमाधारकाच्या वारसास ठरलेली रक्कम देते व त्या परिवाराची आर्थिक घडी बसवते. जिल्हा स्तरावर एलआयसीच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत आहेत.
ग्रामीण भागातील ग्राहकांना विमा सेवेच्या कामासाठी अभिकर्ता यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच अनेक नागरिकांच्या विमा पॉलिसी बंद पडल्या जातात व त्यांना अकस्मात घडलेल्या घटनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील विमाधारकांना त्यांच्या पॉलिसीचे प्रिमियम भरणे व इतर कामे त्यांच्या गावाजवळ करता यावे म्हणून एलआयसीने आता तालुकास्तरावर एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँच सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.
सॅटेलाईट ब्रँचमध्ये या मिळणार सुविधा
सॅटेलाईट ब्रँचमधून त्यांच्या इतर ब्रँचसारखेच पॉलिसीचे प्रिमियम भरणे, पॉलिसीवर कर्ज, बंद पॉलिसी पुनर्जिवीत करणे, पॉलिसीची सध्याची स्थिती माहिती करणे, नवीन पॉलिसी काढणे यासह अनेक कामे या सॅटेलाईट ब्रँचमध्ये करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील विमाधारकांना सुविधा व्हावी म्हणून एलआयसी केंद्रीय कार्यालयाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार सेटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली असून केंद्रीय कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे.
-मुकेशचंद्र जोशी
सिनीअर विभागीय व्यवस्थापक, नागपूर.