तीन तालुके हागणदारीमुक्त
By admin | Published: January 25, 2017 12:46 AM2017-01-25T00:46:25+5:302017-01-25T00:46:25+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषद गेल्या तीन वर्षापासून सतत अग्रक्रमावर राहिली आहे.
जिल्हा परिषदेची स्वच्छ भारत मिशनमध्ये भरारी : मूल, पोंभुर्णा व ब्रह्मपुरी तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण
चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषद गेल्या तीन वर्षापासून सतत अग्रक्रमावर राहिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनच्या कामाला जिल्ह्यात गती निर्माण झाली असून जानेवारी महिन्यातच २०१६-१७ या वर्षासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळेच सन २०१६-१७ मध्ये मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तीन तालुके हागणदारीमुक्त करण्यात आले आहेत.
वैयक्तीक शौचालय बांधकामात उद्दिष्टापलिकडे जावून ३४ हजार २४३ शौचालय बांधकाम या वर्षात पूर्ण करण्यात आले असून १०१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. पुढील काळात ६० हजार शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे. सन २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३३ हजार ७५२ वैयक्तिक शौचालयाचे व मूल, ब्रम्हपुरी ही दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी स्वच्छ भारत मिशनच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचेच फलित म्हणून २०१६-१७ वर्षात मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तीन तालुके हागणदारीमुक्त करण्यात आले आहेत. तर दिलेल्या उद्दिष्टा पलिकडे जावून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे केल्या जात आहे. याच नियोजनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंमलबजावणी करुन टप्प्याटप्प्याने तालुके हागणदारी मुक्त करण्यात येणार आहेत.
सन २०१६-१७ या वर्षात बल्लारपुर तालुका हागणदारी मुक्त करुन विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणुन जिल्हा परिषदेला मान मिळाला.
हिच प्रेरणा घेवून या वर्षात मूल, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा ही तालुके हागणदारी मुक्त करुन, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबढे, ब्रम्हपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप बिरमवार व तत्कालिन गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, पोंभुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे हे यशाचे मानकरी ठरले आहेत.
चार तालुके हागणदारीमुक्त करणारी चंद्रपुर जिल्हा परिषद ही विदर्भातील एकमेव ठरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
करण्यात सातवा क्रमांक
सन २०१३ ते २०१६ या चार वर्षात झालेल्या कामाचा विचार केल्यास सन २०१६-१७ या चालु वर्षात ३४ हजार २४३ वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात जिल्हा परिषद यशस्वी झाली आहे. जिल्हा हागणदारी मुक्त चे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर वेगाने सुरु आहे. जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायती पैकी ५२७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या असून चंद्रपुर जिल्हा परिषद ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्याच्या कामात राज्यात सातव्या क्रंमाकावर आहे. तर वैयक्तिक शौचालय बांधकामात राज्यात बाराव्या क्रंमाकावर आहे.
तालुकानिहाय कामाचा घेतला जातो आढावा
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कामांची माहिती केंद्र शासनाच्या संकेंतस्थळावर उपलब्ध आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनची पूर्ण चमू तालुका निहाय कामाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अंतर्गत कामे केली जात आहे. राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्ह्यातील राजगड व साखरवाही या गावाला भेट दिली देऊन कामाची पाहणी केली होती. त्यांनी सुरू असलेल्या कामाचे कौतूक केले.
२०१९ पर्यंत स्वच्छ भारत देशाचे पंतप्रधानांचे स्वप्न असून यास खरे उतरविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषद प्रयत्नशिल आहे. गावा-गावात शौचालयाची कामे गतीने होत असून स्वच्छतेची जाणीव ग्रामस्थांमध्ये तयार होत आहे. यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम सतत राबविल्या जात आहे. याचा परिणाम जिल्हा हागणदारी मुक्त करण्यास मदत होणार आहे.
- एम. डी. सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर.