ग्रामीण भागातील रस्त्यांचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:50 AM2017-10-12T00:50:00+5:302017-10-12T00:50:25+5:30
रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. नागरिकांना कोसोदूर पायदळ पायपीट करावी लागते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र तरीही नागरिकांच्या जिवाचे हाल थांबायला तयार नाही. बहुतांश ठिकाणी रस्त्यांचे तिनतेरा वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी, हा जनतेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षानंतरही अनुत्तरीतच आहे. रस्ते आणि विकास हे दोन्ही शब्द अगदी जवळचे आहे. मात्र हे दोनही शब्द एकमेकांपासून कोसोदूर गेल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत सर्वेक्षण केले असता अनेक गावात जायला धड रस्ताच नसल्याचे दिसून आले.
भोयगाव-कवठाळा, गोवरी-पोवनी, चिंचोली-साखरी, चिंचोली-कळमना, भोयगाव फाटा-अंतरगाव, आवाळपूर-हिरापूर, हिरापूर-अंतरगाव, चार्ली-निर्ली, अंतरगाव-वनोजा, नोकारी-नांदाफाटा, चारवट-माना, पाचगाव-पारधीगुडा या ग्रामीण भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
कवठळा- भोयगाव-धानोरा हा मार्ग तर खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की या मार्गावरुन प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे. या रस्त्यावर मागील महिन्यात रस्त्यातच आॅटो उलटल्याची घटना घडली होती. यावरुन या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. मात्र सामान्य माणूस मेला काय नि वाचला काय, याचे कोणालाही सोयरसुतूक नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची एवढी मोठी दूरवस्था झाली आहे की हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवाव्या
राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार सतेत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी सरकारमधील लोकप्रतिनिधींना आहे. रस्ता ही नागरिकांची मुलभूत समस्या असताना याकडे सरकार गांभीर्याने का पाहत नाही, हा जनतेचा सवाल असून रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.