गडीसुर्ला नळ योजनेला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:11 AM2018-02-09T00:11:59+5:302018-02-09T00:12:10+5:30
ऑनलाईन लोकमत
भेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़
पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात़ पाईन लाईनलस गळती असल्याने पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते. शासनाने पाणी बचतीसाठी जनजागृती करीत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात नळांना मीटर बसवून पाणी जपून वापरण्याचे संकेत दिले आहेत़ तर दुसरीकडे नळयोजनेची दुरूस्ती करण्यासाठी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे चित्र या परिसरात दिसून येत आहे़ यंदा अल्प पाऊस पडल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खालावली़ काही ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याने महिला हैराण झाल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना योग्यरित्या सुरू ठेवल्यास १९ गावांतील नागरिकांची अडचण कायमची दूर होवू शकते़ मात्र, पाईप लाईनला शेकडो ठिकाणी गळती असल्याने यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती झाली नाही, तर काही दिवसांत पाण्यासाठी हाहाकार निर्माण होवू शकतो़
यासंदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे़ पण, अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळावर येवून पाहणी केली नाही़ पाईपलाईन गळती असलेल्या शेतात दिवस-रात्र पाणी वाया जात आहे़ नागरिकांकडून पाण्याचे देयक वेळेवर भरले जाते़ शासनाच्या सर्वच योजनांना सहकार्य करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली़ पण, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे १९ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे़
जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांपासून पाईपलाईनला गळती आहे़ यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय, काही गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होतो़ त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी ही समस्या तातडीने सोडवावी़
- प्रकाश गांगरेड्डीवार, माजी सभापती पं.स. मूल