जलस्वराज्य-२ च्या माध्यमातून गावे सुजलाम् सुफलाम् करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:21 PM2017-12-22T23:21:12+5:302017-12-22T23:21:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांचा समावेश करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांचा समावेश करण्यात आला आहे. योजना सुरू होण्याआधी ग्रामस्थांना पाणी वापराबाबत चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी पाणी वापराबाबत सजग राहून आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा व पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी सरपंच व सचिव यांनी आपापल्या गावात पाण्याची चळवळ निर्माण करून गावे सुजलाम् सुफलाम् करावी, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात सरपंच, सचिव व कंत्राटदार यांची जलस्वराज्य-२ गावात सुरू असलेल्या कामासंबंधीच्या प्रगतीबाबतचा आढावा व समन्वय सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जलस्वराज्य-२ कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप देशमुख, आयुक्त कार्यालयाचे उपअभियंता शरद रोडे उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता संजय वाघ, कार्यकारी अभियंता दशरथ पिपरे वरिष्ठ भुवैज्ञानिक विश्वास वालदे, समाज व्यवस्थापन तज्ज्ञ मंगेश भालेराव, विभागीय समन्वयक विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेला मार्गदर्शन करताना जलस्वराज्य-२ चे प्रकल्प व्यवस्थापक म्हणाले, या प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील ४० गावे समाविष्ट करण्यात आले आहे. मीटर पद्धतीसुद्धा ही उच्च दर्जाची राहणार असून प्रत्येकाला पाणी पोहचले पाहिजे, ही शासनाची भूमिका असून त्याची अंमलबजावणी करणे सरपंच, सचिव तसेच ग्रामस्थ यांची असल्याचे ते म्हणाले.
जलस्वराज्य -२ योजनेच्या एकार्जूना व कुचना या गावातील कामांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. यावेळी दोन्ही गावातील सरपंच व ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जलस्वराज्य-२ कार्यक्रमाबाबतची सद्यस्थिती व प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते यांनी केले. राज्यस्तरावरुन मंगेश भालेराव यांनी सादरीकरण केले.