तिकीट वाटपापूर्वीच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

By admin | Published: January 21, 2017 12:39 AM2017-01-21T00:39:44+5:302017-01-21T00:39:44+5:30

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात स्वमर्जीतील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देऊन टिकीट वाटपाची योजना आ. विजय वडेट्टीवार यांनी आखली आहे.

Before the ticket is allocated in the Congress, | तिकीट वाटपापूर्वीच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

तिकीट वाटपापूर्वीच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

Next

रामभाऊ टोंगे यांचा राजीनामा : मुलाखती केवळ फार्स असल्याचा आरोप
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात स्वमर्जीतील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देऊन टिकीट वाटपाची योजना आ. विजय वडेट्टीवार यांनी आखली आहे. आता पुन्हा मुलाखतीचे नाटक कशासाठी, असा थेट आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी करीत जिल्हा परिषद सदस्याचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शुक्रवारी उमेदवार निवड समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्याकडे सोपविला. यामुळे गटबाजीच्या विषयावरून आधीच चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या अंर्तगत राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील स्वमर्जीतल्या उमेदवारांना तीन दिवसापूर्वी कामाला लागण्याचा संदेश दिला. त्याचप्रमाणे राजुराचे माजी आ. सुभाष धोटे यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना तोच कित्ता गिरवला. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स कशासाठी केला, असा आरोप रामभाऊ टोंगे यांनी निवड समितीचे प्रमुख अग्रवाल यांना दिलेल्या पत्रकातून केला आहे.
काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या अनेक प्रामाणिक व जनतेच्या संपर्कातील इच्छूक उमेदवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५ हजार रुपये व पंचायत समिती निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून २ हजार ५०० रुपये भरले. अशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुलाखतीचे नाटक कशाला दाखवता, असाही आरोप त्यांनी केला. अशा आशयाचे पत्रक मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या व समर्थक कार्यकर्त्यांच्या हाती लागल्याने अनेकांनी मुलाखतीच्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. अनेक जण पत्रकाचे वाचन करून कुतूहलाने चर्चा करून काँग्रेसमधील गटबाजी केव्हा संपुष्टात येणार, असीही चर्चा करीत होते.
महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी घोडेबाजाराच्या माध्यमातून आ. विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्याच्या राजकारणात समोर केले आहे. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे व स्वमर्जीतील कार्यकर्त्यांना जोपासल्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेसची पिछेहाट झाली.
‘तिन तिघाडा व काम बिघाडा’, अशी काँग्रेसची अवस्था केल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांची भूमिका भाजपाला सहकार्य करणारी ठरत आहे. त्यामुळे आम्ही हतबल असून अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा शिपाई आहोत. परंतु राजकारणाच्या सारीपाटावर वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काम करणे अवघड आहे, अशी भावना व्यक्त करून जि. प. सदस्याचा राजीनामा देत असल्याचे रामभाऊ टोंगे यांनी पत्रकात म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

सर्वांना सोबत घेवून व विचार मंथन करून आगामी निवडणुकीला सामोरे जाणे अगत्याचे होते. उमेदवारी कोणाला द्यायची, हे अगोदर ठरत असेल तर मुलाखतीचा देखावा योग्य नाही. गटाबाजीला प्रोत्साहन देणारे राजकारण आमदार वडेट्टीवार करीत असून तिकीट मिळावे म्हणून पक्षांकडे ज्या उमेदवारांनी रकमेचा भरणा केला आहे, तो परत करावा. गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सदस्यत्वाचा प्रदेशाध्यक्षांकडे तर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आपण राजीनामा पाठविला आहे.
- रामभाऊ टोंगे,
जि.प. सदस्य, चंद्रपूर

Web Title: Before the ticket is allocated in the Congress,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.