चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले सुरूच; चिमूर तालुक्यात वाघाने घेतला शेतकऱ्याचा बळी
By राजेश भोजेकर | Published: May 15, 2024 08:38 AM2024-05-15T08:38:01+5:302024-05-15T08:38:19+5:30
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतकरी शेतात गुरेढोरे बांधून त्याच्या रखवालीसाठी जात होता.
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारे उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे(३३) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे.
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतकरी शेतात गुरेढोरे बांधून त्याच्या रखवालीसाठी जात होता. त्याचे शेत चिमूर-वरोरा या राज्य महामार्गाला लागून आहे. शेताची रखवालीसाठी हा रात्रभर शेतावर झोपत होता. मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यानंतर या वाघाने त्याच्या शरीराचा अर्धा भाग पूर्णपणे खाल्लेला आहे. बैल व गुरे ढोरे घेऊन रोज सकाळी येणारा भाऊ घरी आला नाही म्हणून त्याचा लहान भाऊ शेतावर गेला असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच याची माहिती गावकऱ्यांना दिली. संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले. वन विभागाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर हे आपल्या कर्मचाऱ्यासह हजर झालेले आहे. अंकुश हा अविवाहित असून नेहमी आपल्या शेतावर जागल करायला जात होता.