वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 04:30 PM2022-02-05T16:30:25+5:302022-02-05T16:37:27+5:30
सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.
चंद्रपूर : एकीकडे वनविभागवाघ-मानव संघर्ष कसा कमी होईल हे सांगण्यात मश्गूल असतो आणि दुसरीकडे हाच विभाग या संघर्षाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-मुधोली मार्गावर सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. या सोलर कुंपणामुळे वाघाचा नैसर्गिक मार्ग बंद झाला. हा इरई धरणाकडे जाण्याचा वाघाचा मार्ग होता. सोलर कुंपण टाकल्यापासून वाघाला इरई धरणाकडे जायचे असल्यास तो सीतारामपेठ व कोंडेगाव शिवारात येत आहे. त्याला आता वळण घेऊन धरणावर जावे लागत आहे.
या शिवारात गुराखी जनावरे चराईसाठी आणतात. यापूर्वी अनेकदा वाघांचे हल्ले झाले आहेत. जनावरांना ठार करणे हे नित्याचेच झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी अनेकांनी दुधाळ जनावरे विकली आहेत. ३ फेब्रुवारी सीतारामपेठ येथे नमू संभाजी धांडे या गुराख्याचा बळी गेला याचे कारणही ही सोलर कुंपणच आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून दिली. यावेळी अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधले.
वाघाचे हल्ले आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने वाघाच्या मार्गात टाकलेले सोलर कुंपण हटवावे, अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपचसंचालक, पालकमंत्री, खासदार, आमदारांना दिले आहे. निवेदनावर सरपंच सुषमा जीवतोडे, उपसरपंच शामल नन्नावरे, सदस्य सुषमा ढोक, नीता गेडाम, सलाम शेख, गोविंदा ढोक, देवानंद नैताम यांच्या स्वाक्षरी आहेत.