कुडाची फुले आणायला जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला, एक महिला ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:51 PM2018-06-10T12:51:49+5:302018-06-10T12:51:49+5:30
फुले काढत असताना अचानकपणे देवांगना देविदास निकेसर या महिलेवर वाघाने हल्ला चढविला.
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील पाच महिला केवाडा जंगलात कुड्याची फुले आणायला गेल्या असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये एक महिला ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ब्रह्मपुरी डिव्हिजन तळोधी रेंज अंतर्गत येत असलेल्या महादवाडी येथील ५ महिला कुड्याचची फुले आणण्यासाठी जवळ असलेल्या केवाडा जंगलात गेल्या होत्या. फुले काढत असताना अचानकपणे देवांगना देविदास निकेसर या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. त्यात ती जागेवरच मरण पावली. जवळच असलेल्या दुसऱ्या महिलेने आरडाओरड केल्याने वाघाने तिच्यावरही हल्ला केला. त्यात पार्वती राघजी लेनगुरे गंभीर जखमी आहे. इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. परंतु, या घटनेमुळे तीन महिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या गावात दहशतीचे वातावरण आहे.