वाघ चवताळले; सात महिन्यांत घेतला २४ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:05 AM2021-07-09T11:05:19+5:302021-07-09T11:09:15+5:30
Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे.
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. या घटनांनी त्या त्या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. वाघांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे दर्शन होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावांतील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदुपत्ता हंगाम आला तर जंगलात जाणे आलेच. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने मोफत गॅस सिलिंडर दिले़,मात्र गॅस सिलिंडरच्या किमती गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. शेवटी जंगलात जाणे आलेच. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी वाघांचे हल्ले होऊन गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सर्वाधिक दहा हल्ले ब्रह्मपुरी वनविभागात झालेले आहेत. या पाठोपाठ सात हल्ले चंद्रपूर वनविभागातील आहेत. चंद्रपूर बफरमध्ये तीन, चांदा वनविभागात दोन, चंद्रपूर चांदा व वेस्ट चांदा वनविभागात प्रत्येक एक हल्ला वाघाने केला आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम असतानाही शेतावर जाता येत नाही. चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात आठवडाभर वाघीण दोन बछड्यांसह फिरत होती. आता ती परिसरातील पिपर्डा गावाकडे गेली आहे. दहशत मात्र संपलेली नाही. यावर उपाययोजना करण्यात वनविभाग कमी पडत असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव नवीन नाही. यावर कायम तोडगा काढण्यात अद्यापही यश आल्याचे या घटनांवरून दिसत नाही.