वाघ पिंजऱ्याकडे भटकलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:44 PM2018-12-05T22:44:40+5:302018-12-05T22:45:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावा शेजारीला शेतात एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्या परिसरात बोकड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावा शेजारीला शेतात एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्या परिसरात बोकड ठेवलेले पिंजरे लावण्यात आले. त्यात २४ तासापेक्षा अधिकाळ लोटूनही वाघ पिंजऱ्याकडे भटकला नसल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावातील देवराव भिवाजी जीवतोडे (६०) या शेतकऱ्याचा शेतात वाघाने बळी घेतला. अर्जुनी गावातील अवघ्या काही दिवसातील तिसरी घटना असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करा, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर वनविभागाने शेतकऱ्यांच्या ज्या शेतात वाघाने बळी घेतला, त्या परिसरात तीन पिंजरे बोकड बांधून लावण्यात आले. शिकारीवर ताव मारण्याकरिता वाघ त्या परिसरात येईल व तो पिंजऱ्यामध्ये अडकेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु वाघ भटकलाच नाही.
संयुक्त गस्त
वनविभागाचे कर्मचारी व गावातील दहा युवक वाघ व वन्यप्राण्यांना पिटाळण्याकरिता संयुक्त गस्त घालणार असून गस्तीमध्ये सहभागी युवकांची निवड ग्रामस्थ करणार असून वनविभागातर्फे त्यांना मानधन दिले जाणार आहे.