चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून जखमी असलेल्या ढाण्या वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:19 PM2018-02-26T13:19:09+5:302018-02-26T13:19:16+5:30

दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.

Tiger died who was wounded five days in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून जखमी असलेल्या ढाण्या वाघाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून जखमी असलेल्या ढाण्या वाघाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देउपचारापूर्वीच गेला बळीपरवानगीच्या प्रतीक्षेत आला मृत्यू

राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये एका तलावाच्या शेजारी त्याने नाईलाजाने ठाण मांडले होते. हा प्रकार वनविभाग डोळे उघडून बघतही होता. मात्र वाघावर तत्काळ उपचार करण्याची तसदी या विभागाने घेतली नाही. त्यामुळे उपचारापूर्वीच त्या वाघाला अन्न, पाण्याविना प्राण सोडावा लागला. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ आणि संतापही व्यक्त केला जात आहे.
दोन वाघांच्या झुंजीत जखमी झालेला पट्टेदार वाघ पाच दिवसांपूर्वी चिमूर वनपरिक्षेत्रातील भात्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये आला. गाव तलावाजवळ त्याने आश्रय घेतला. हा जखमी वाघ बुधवारी गावकरी व वनरक्षक एस. एन. पाटील यांना दिसला. त्यांनी याची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा वाघ जखमी असल्याने शिकार करू शकत नव्हता. अशक्तपणामुळे पाणी प्यायला तलावातही जाऊ शकत नव्हता. त्याला बेशुध्द करून उपचार करण्यासाठी पीसीसीएफची परवानगी आवश्यक असते. येथील वनाधिकाऱ्यांनी वाघावर उपचार करण्यासाठी पीसीसीएफ नागपूर यांना परवानगी मागितली. मात्र मागील पाच दिवसात पीसीसीएफकडून अशी कुठलीही परवानगी आली नाही.
दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर पाच दिवसानंतर रविवारी वाघाला बेशुध्द करण्यासाठी नऊ जणांचे पथक भान्सुली जंगलात दाखल झाले. हे पथक जखमी वाघाला सुन्न करून तेथेच प्राथमिक उपचार करणार होते. मात्र ट्रॅक्यूलायझेशनची परवानगी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पथक वाघाजवळ गेले. मात्र वाघाचा मृत्यू झाला होता. खडसंगी येथील विश्रामगृह परिसरात उपवनसंरक्षक गजेद्र हिरे, सहायक उपवनसंरक्षक आर. एम. वाकडे, दक्षता उपवनसंरक्षक ब्राम्हणे, आर.एफ.ओ. भाविक चिवंडे, डॉ. हिमांशु जोशी, डॉ. रवी खोब्रागडे, उदय पटेल, मानद सचिव बंडु धोत्रे, वन्यजीव प्रतिनिधी अमोद गौरकर यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघावर अग्निसंस्कारही करण्यात आले.

मृत्यूला जबाबदार कोण ?
पाच दिवसांपासून जखमी वाघ भान्सुली जंगलात वेदनेने विव्हळत होता. वनाधिकाऱ्यांनी त्या वाघाचे छायाचित्रही काढले. त्यात त्याच्या पायावर व डोक्यावर जखमाही दिसून आल्या. वनजीव कायद्यानुसार एखादा वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याच्यावर ४८ तासात उपचार होणे आवश्यक आहे. मात्र येथे संपूर्ण वनविभाग जखमी वाघाच्या वेदना न्याहाळत बसला. वाघावर तत्काळ उपचार झाला असता तर तो निश्चित वाचला असता, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. मात्र असे झाले नाही. अखेर उपचाराविनाच वाघाचा मृत्यू झाला. या घटनेला वनविभाग आणि वनाधिकाºयांचा हलगर्जीपणाच जबाबदार असेल तर दोषींवर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे.

परवानगी मागायला की द्यायला विलंब ?
जखमी वाघावर उपचार करायचा असेल तर त्याला बेशुध्द करण्यासाठी नागपूर येथील पीसीसीएफकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र भान्सुली येथील प्रकरणात ही परवानगी प्राप्त व्हायला तब्बल पाच दिवस लागले. त्यामुळे जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी पीसीसीएफला परवानगी मागण्यासाठी विलंब केला की सर्व ठाऊक असतानाही पीसीसीएफने परवानगी द्यायला उशिर केला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

Web Title: Tiger died who was wounded five days in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ