वाघाच्या अफवेमुळे दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:10 PM2018-06-24T23:10:42+5:302018-06-24T23:11:10+5:30
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना कुत्र्यामध्येही वाघ दिसत आहे. शनिवारीही वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पसरली. तेव्हा वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो वाघ नसून कुत्रा असल्याचे समोर आले आणि अफवा ती अफवाच ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना कुत्र्यामध्येही वाघ दिसत आहे. शनिवारीही वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पसरली. तेव्हा वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो वाघ नसून कुत्रा असल्याचे समोर आले आणि अफवा ती अफवाच ठरली.
वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत उपवनक्षेत्र नवरगाव मधील नाचनभट्टी बिटातील मिनघरी येथे दोन दिवस असा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी दोन महिला मिनघरी फाट्यावर जाण्यासाठी निघाल्या असता वाटेमध्ये डुकरांच्या मागे कुत्रे धावत होते. कुत्र्याचा रंग लाल असल्याने संबंधीत महिलांना वाघ असल्याचे जाणवले. त्यांनी याची माहिती मिनघरीच्या गावकऱ्यांना दिली. गावकºयांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना व कर्मचाºयांना दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी ज्या परिसरात वाघ दिसल्याचे सांगितले गेले, त्या परिसरात सर्वत्र शोध मोहिम राबविली. शोध मोहिमेनंतर डुकरांच्या व कुत्र्यांच्या पाऊल खुणा आढळल्या आणि त्याच परिसरात लाल रंगाचा कुत्राही आढळून आल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, वाघ बघायला आलेल्या नागरिकांची निराशा झाली.
अशीच घटना दुसºया दिवशी शनिवारी नाचनभट्टी बिटातच मिनघरी जवळील शिवटेकटी परिसरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. येथे वाघाने महिलेला ठार केल्याची वार्ता परिसरात पसरली. ज्यांना ही माहिती मिळाली त्यांनी ही माहिती पुढील दहा जणांना देण्याला सुरुवात केली. जो-तो त्या दिशेने बघण्यासाठी धावू लागले. ही घटना नवरगाव येथील प्रभारी क्षेत्रसहाय्यक जे. एस. वैद्य, वनरक्षक राजेशी नागोसे, वनरक्षक आर. यू. शेख, वनरक्षक नितेश सहारे यांना माहिती होताच ते घटनास्थळी दाखल झाले. शिवटेकडी परिसर व संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मिनघरी येथील महिलेला ठार केले एवढेच लोकांकडून ऐकायला मिळत होते. परंतु, ती महिला कोण, याची शहानिशा होत नव्हती. मिनघरी गावातही शोध घेतला असता अशी कोणतीही महिला बेपत्ता नव्हती. दोन ते अडीच तासांच्या शोध मोहीमेनंतर ही घटना केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर पहायला गेलेले नागरिक व वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी परत आले. शुक्रवार व शनिवारच्या दोन्ही अफवांमुळे तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे.
अफवा पसरवू नये, वनविभागाचे आवाहन
कुणी काहीही सांगितले तरी वाघाच्या बाबतीत लोकांचा विश्वास बसत आहे. अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नाहीतर लांडगा आला रे आला ही गत होवून आणि प्रत्यक्ष वाघ दिसला तरी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये.