ताडोबातील झुंजीत वाघाच्या बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:42 AM2017-11-16T10:42:02+5:302017-11-16T10:46:03+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रातील जानाळा परिसरात कक्ष क्र. ३५५ मध्ये एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रातील जानाळा परिसरात कक्ष क्र. ३५५ मध्ये एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उजेडात आली.
मृत वाघाचे वजन ५०.२५० कि.ग्रॅ. असून त्यांचे अंदाजे वय १४ ते १५ महिने असल्याचे समजते. सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोणकर व डॉ. रवी खोब्रागडे यांनी मृत वाघाची उत्तरीय तपासणी केली. मंगळवारी या परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला चढवून ठार केले होते. ही बाब गुराख्याला माहिती होती. आज दुपारी सदर गुराखी संबंधित वनपाल व वनरक्षकाला घेऊन घटनास्थळ दाखविण्यासाठी गेला होता.
सदर घटनास्थळापासून सुमारे १५ ते २० फूटावर वाघाचा मृतदेह आढळून आला. बछड्याचा पंजा व शेपटी तुटून पडलेली होती. यावरून दोन वाघांमध्ये शिकार झालेल्या गाईवरून झुंज झाली व यामध्ये या बछड्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
झुंजीत वाघाच्या शरीराचे तुकडे
४ जुलै २०१७ रोजी मूल बफर क्षेत्रातील डोणी परिसरात दोन बछड्यांचा झुंजीत मृत्यू झाला होता. या दोन्ही बछड्यांची आई त्यापूर्वीच मरण पावली आहे. त्या वाघिणीला तीन बछडे होते. एक बछडा जिवंत होता. तो आता १५ महिन्यांचा झाला होता. या बछड्याची पसिरातील दुसऱ्या वाघासोबतच गाईचे मांस खाण्यावरून झुंज झाली असावी. झुंज इतकी कडवी होती की यामध्ये मृत बछड्याचा पंजा व शेपटी तुटलेली असून शरीरातील आतडेही बाहेर निघालेले आहेत, असे वनविभागाच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झुंज होऊन एकाच वाघिणीचे दोन बछडे मरण पावले होते. हा बछडा त्याच वयाचा असल्यामुळे हे तीन बछडे एकाच वाघिणीचे असल्याचा संशय आहे. यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
- मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.