मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:57 PM2019-04-22T22:57:41+5:302019-04-22T22:58:10+5:30
तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु.: तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार, श्रेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांना निवेदन दिले आहे. मासळ बु येथील अमरनाथ गंधरे यांच्या शेतात, पटेदार वाघाने एक बैल मारला तर एक गंभीर जखमी केला. दुसºया दिवसी शामराव धारणे यांच्या बैलाची शिकार केली. अडेगाव म्हसली येथील शेतकºयाचे दोन बैल मारले, तुकुम येथील अशोक खिरडकर यांच्या गायीला ठार मारले, दिलीप सूर यांच्या गायीवरही हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यांपासून तुकुम येथील तलावात वाघ वास्तव्य करीत असल्याचे अनेकांना दिसले आहे. मात्र वन विभाग येतो, पाहतो व पंचनामा करतो. त्याउपरही कुठलीही ठोस उपाययोजना वनविभागाने केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. निवेदन देताना अमरनाथ गंधारे, प्रदिप गंधारे, दिलीप गंधारे, अकाश बोरकर, सागर सुखदेव, भावराव सूर, विकास गरमडे, वंसता झापे, देवनाथ वावरे, ग्रामपंचायत मासळ, वनहक्क समितीचे सदस्य, ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते.
वाघाचे वारंवार दर्शन
अनेकाना शेतात, रस्त्यावर वाघाचे दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी मानेमोहाळी येथील सुभाष कराळे वाघाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. ही घटना समोर आली, तेव्हापासून मासळ बु. परिसरातील नागरिकामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.
सौरकुंपण करावे
जंगलातील हिंस्र प्राणी सध्या शिकार व पाण्याच्या शोधात गावात येत आहेत. या वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्यासाठी सौर कुंपण करणे गरजेचे आहे. मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावात येऊन वाघाने बैलाची शिकार करणे सुरूच ठेवले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शेतकामे खोळंबली आहेत. मासळ बु परिसरातील नागरिकामध्ये चांगलीच धास्ती भरली आहे.
मासळ बु परिसरात दोन महिन्यांपासून वाघ पाळीव जनावरांवर हल्ला करीत आहे. तरीही वनविभाग सुस्तच आहे. अनेकांची जनावरे वाघाने मारली आहेत. शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. वनविभागाने सर्वप्रथम वाघाचा बंदोबस्त करावा.
- अमरनाथ गंधारे, शेतकरी, मासळ बु.