बापरे! गळ्यात शिकारीचा फास अडकलेला वाघ जंगलात; वन विभागाची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:12 AM2021-05-30T09:12:01+5:302021-05-30T09:12:17+5:30

, पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन

tiger with a hunter's snare around its neck in the forest | बापरे! गळ्यात शिकारीचा फास अडकलेला वाघ जंगलात; वन विभागाची धाकधूक वाढली

बापरे! गळ्यात शिकारीचा फास अडकलेला वाघ जंगलात; वन विभागाची धाकधूक वाढली

Next

- प्रवीण खिरटकर

वरोरा (जि. चंद्रपूर) : जंगलात शिकारीकरिता लावलेल्या फासात चक्क एक वाघ अडकला. परंतु ताकदीने वाघ पुढे निघाल्याने तो फास त्याच्या गळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपासून वाघाच्या गळ्यात फास असल्याने वनविभागाची धाकधूक वाढली आहे. अधिक दिवस फास वाघाच्या गळ्यात राहिल्यास त्याला शिकार करता येणार नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वरोरा वनपरिक्षेत्रातील पळसगाव परिसरात काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्यास या भागात रक्त आढळून आले. वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाच्या गळ्यात पट्टा असल्याचे दिसून आले. तो पट्टा बांधलेला असावा, असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करून वनविभागाने संभ्रम वाढविला. याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, अधिक चौकशी केली असता वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता लावलेल्या फासामध्ये हा वाघ अडकल्याचे निष्पन्न झाले.

वाघाच्या गळ्यात पट्टा नसून तो फास आहे, ही बाब वन विभागाच्या लक्षात येताच मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे. 
वाघाच्या गळ्यात असलेला फास जर घट्ट झाला, तर त्याला काही खाता येणार नाही. शिकारही करता येणार नाही. असाच तीन-चार दिवस राहिल्यास भुकेने मृत्युमुखी पडू शकतो. तो पट्टेदार वाघ मादी असून वयस्क असल्याची माहिती आहे.

बकरी पिंजऱ्यातून पळाली
वाघ पिंजऱ्यात यावा याकरिता पिंजऱ्यात बकरी बांधली होती. रात्रभर वाघ पिंजऱ्याकडे फिरकला नाही. सकाळी वन कर्मचाऱ्याने बकरीला पाणी पिण्याकरिता सोडले असता बकरी पळून गेली. मग बकरीची शोधमोहीम वनविभागाचे कर्मचारी करू लागले. अथक परिश्रमानंतर पाच ते सहा तासांनी बकरी वन कर्मचाऱ्यांना मिळाली.

तो फास नायलाॅनचा
तीन दिवसांपूर्वी एका वाघाच्या गळ्यात फास अडकल्याचे लक्षात आले. त्या वाघाचा शोध वरोरा वनविभागाची टीम घेत आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास हा नायलाॅनचा आहे. यामुळे वाघाला जीविताला धोका नाही. वाघ दिसताच त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- एन. आर. प्रवीण,
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर

Web Title: tiger with a hunter's snare around its neck in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.