तेलंगणात वाघाची शिकार; कातडीची तस्करी महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:36 AM2023-04-03T10:36:54+5:302023-04-03T10:38:15+5:30
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश : जिवती वनविभागाची कारवाई
जिवती (चंद्रपूर) : मध्य चांदा वनविभागातील जिवती वनपरिक्षेत्रामधील पाटागुडा येथे वाघाची शिकार करून कातड्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. यात सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व जिवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांनी तालुक्यातील पाटागुडा गावी सापळा रचून वाघाची कातडी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकूण सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता वाघाची शिकार संबंधित आरोपींनी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद नजीकच्या भागात केली आणि वाघाची कातडी तस्करी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिवती येथील पाटागुडा गावात आणले. तस्करी प्रकरणी मागील तीन ते चार महिन्यांपासून या टोळीच्या मागावर असताना शनिवारी रात्री मोठ्या प्रयत्नानंतर जिवती वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले.
सदर कार्यात जिवती वनपरिक्षेत्रातील धर्मेंद्र राऊत, क्षेत्र सहायक के. बी. करकाडे, क्षेत्र सहायक एस. व्ही. सावसाकडे, अनंत राखुंडे, संजय गरमडे, प्रदीप मरापे, संतोष अलाम, बालाजी बिंगेवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, मध्य चांदा श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व जिवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे करीत आहेत.