रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; दोन महिन्यांतील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:01 AM2022-10-22T11:01:01+5:302022-10-22T11:18:11+5:30
राजुरा वन परिक्षेत्रातील घटना
सास्ती (चंद्रपूर) : रेल्वेची धडक बसल्याने वाघाचामृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर ते काझीपेट जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर राजुरा तालुक्यातील चनाखा-सातरी गावाजवळील वन विभागाच्या कक्ष क्रमांक १५८ लगतच्या रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चुनाळा नियत वन क्षेत्रामधून जाणाऱ्या बल्लारपूर ते काझीपेट या दक्षिणमध्ये रेल्वे लाईनची रेल्वे गँगमन नेहमीप्रमाणे सकाळी गस्त करीत असताना कक्ष क्रमांक १५८ ला लागून असलेल्या रेल्वे रुळावर वाघ मृतावस्थेत आढळून आला. गँगमनने लगेच राजुरा वन विभागास याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, विहीरगाव क्षेत्र सहाय्यक नरेंद्र देशकर, टेंबूरवाहीचे संतोष संगमवार, वनरक्षक देवाजी शेंडे, सुनील मेश्राम, सुनील गज्जलवार, दिलीप जाधव आणि वनमजूर घटनास्थळी पोहोचले. मोका पाहणीनुसार पहाटेच्या वेळेत रस्ता ओलांडताना रेल्वेची धडक बसली असावी, असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सदर वाघ नर असून, त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असावे. घटनास्थळी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांनीही भेट दिली. पुढील कार्यवाही सुरू आहे. शवविच्छेदन करून मांसाचे तुकडे फॉरेन्सिक लॅब येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. या रेल्वे मार्गावर दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असून, रेल्वेच्या धडकेत वाघ व इतर वन्यप्राणी नेहमीच मृत्यूमुखी पडत आहेत. याची वनविभागाने गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी संघटनेने केली आहे.