‘माॅर्निंग वाॅक’ करणाऱ्यांसमोरच वाघाने घेतला महिलेचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:55 AM2021-12-17T10:55:42+5:302021-12-17T11:02:52+5:30

गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले.

tiger kills woman in pombhurna range in chandrapur district | ‘माॅर्निंग वाॅक’ करणाऱ्यांसमोरच वाघाने घेतला महिलेचा जीव

‘माॅर्निंग वाॅक’ करणाऱ्यांसमोरच वाघाने घेतला महिलेचा जीव

Next
ठळक मुद्देपोंभुर्ण्यातील धक्कादायक घटना

चंद्रपूर : वेळेवा-पोंभूर्णा मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या एका महिलेवर रस्त्यालगतच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना घडली त्यावेळी काही नागरिकही आजूबाजूला हाेते. त्यांच्यासमाेर ही घटना घडली. आरडाओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळाहून पळ काढला.

संध्या विलास बावणे (३८) रा. वेळवा असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. त्यांनी आरडाओरड केली. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले.

मृतदेह उचलू देण्यास नकार

वेळवावासी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोंभूर्णा वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र वनाधिकारी मृतदेह उचलण्यासाठी गेले असता कुटुंबीयांनी व वेळवावासीयांनी मृतदेह उचलू दिला नाही. जोपर्यंत नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तब्बल आठ तास मृतदेह तसाच घटनास्थळी होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी करून मृतकाच्या कुटुंबांला तत्काळ मदत व कायमस्वरूपी नोकरीची अट घातली. मध्य चांदा वनविभागाचे ए. सी. एफ. शर्मा यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मृतकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यासंबंधी लेखी आश्वासन दिले.यावेळी वनविभागाचे एसीएफ शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, वनक्षेत्र अधिकारी आनंदराव कोसरे उपस्थित होते.

आणखी किती बळी?

याच वर्षी मार्चमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कविठबोळी शिवारात वाघाने ठार केले. गुरुवारी ही घटना घडली. हा वाघ आणखी किती बळी घेणार, असा संतप्त नागरिकांचा सवाल आहे.

Web Title: tiger kills woman in pombhurna range in chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.