टेमुर्डा परिसरात वाघाचे वास्तव्य
By admin | Published: December 27, 2014 10:47 PM2014-12-27T22:47:48+5:302014-12-27T22:47:48+5:30
तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील जंगलात मागील एक महिन्यापासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. तीन दिवसांपूर्वी तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. त्यानंतरही अनेकदा वाघाने
वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील जंगलात मागील एक महिन्यापासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. तीन दिवसांपूर्वी तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. त्यानंतरही अनेकदा वाघाने दर्शन दिल्याने वनविभाग सतर्क झाला असून याच परिसरात वाघाचे पगमार्ग आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहे.
वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या टेमुर्डा वनपरिमंडळ, क्षेत्र क्रमांक सातमध्ये टेमुर्डा, रामपूर, मांगली, बोरगाव (शि), फत्तापूर, मांडवघोराड, वडधा सोसायटी आदी गावांचा समावेश आहे. या गावालगत मोठ्या प्रमाणात जंगलही आहे. या जंगलात वनविभागाने काही दिवसांपूर्वी दोन पानवठे व गवताचे रान तयार केले आहे. पानवठे असल्याने या जंग़लात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. याच परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाने बस्तान मांडले आहे. काही ग्रामस्थांना याच वाघाने दर्शनही दिल्याची माहिती वनविभागाला मिळताच विभागाने सदर परिसरात लक्ष ठेवणे सुरू केले आहे. वाघाने या परिसरात पगमार्ग आढळून आले असून त्याचे वय दोन वर्ष असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ताडोबा अभयारण्यातून वाघ भटकलेला असून त्याला या परिसरात पानवठ्यामुळे इतर वन्यप्राणी आढळत असून ते त्याचे खाद्य झाल्याने या वाघाने बस्तान मांडण्याची शक्यता आहे. वाघाने अद्याप मानव व गुरावर हल्ला केला नाही. परंतु वाघाच्या अस्तित्व असलेल्या जंगलात जाणे धोक्याचे झाले आहे. एका वाघाला ४० किमी जंगलाचा परिघ असलेल्या जागेची आवश्यकता असते. २४ डिसेंबरला टेमुर्डा गावाजवळील नागपूर- चंद्रपूर मार्गावर अनेकांनी वाघ रस्ता ओलांडताना बघितला. वाहने जागेवर थांबवून वाघाचे दर्शन घेण्याचा आनंद नागरिकांनी लुटला असला तरी जंगल परिसरातील गावामध्ये असलेल्या नागरिकांमध्ये दहशत आहे. (तालुका प्रतिनिधी)