चंद्रपूर वीज केंद्र परिसरात वाघाचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:18 AM2019-07-07T00:18:06+5:302019-07-07T00:19:26+5:30
चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर (चंद्रपूर) : चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या हिंस्र प्राण्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने वसाहतीतील नागरिकांनी व लगतच्या ग्रामवासीयांनी सतर्क रहावे, अशा सूचना वीज केंद्र व्यवस्थापनाने केल्या आहेत.
चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात हिंस्त्र वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक यांच्यासोबत बैठका झाल्याचे वीज केंद्र व्यवस्थापनाने म्हटले आहे. त्यात सूचविलेल्या उपाययोजनानुसार वीज व्यवस्थापनाने परिसरातील झाडे-झुडुपांची छाटनी करून साफसफाई केली. गावागावात दवंडी पिटण्यात आली आहे. टॅÑप कॅमेरे व मनुष्यबळ उपलब्ध करून योग्य ती कार्यवाही केली. तथापि १२ जूनला आंभोरा गाव परिसरात एका इसमावर वाघाने हल्ला केला. तात्काळ सुरक्षा विभागाचे सहकार्य लाभल्याने त्याचे प्राण वाचले. त्यानंतर १४ जुलैला एक इसम व वाघ समोरासामोर आले. सदर घटनेने चंद्रपूर वीज केंद्रात कार्यरत अधिकारी, कर्मचारी व त्यांचा कुटुंबीयामध्ये तसेच गाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता वीज केंद्राच्या फ्लॉय अॅश व वसाहत परिसरामध्ये पाळीव जनावरे सोडू नये. तसेच अनावश्यक कामासाठी वीज केंद्र परिसरात प्रवेश करू नये, असे आवाहन वीज केंद्र व्यवस्थापनाने वीज केंद्रालगत असलेल्या आंभोरा, खैरगाव, पद्मापूर, किटाळी, मीनगाव, आगरझरी, मसाळा, तुकूम इत्यादी गावातील सरपंच तथा ग्रामवासीयांना केले आहे.