शिवणी जंगलात वाघाचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:20 PM2018-04-21T23:20:40+5:302018-04-21T23:21:22+5:30
शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या मोहफुल वेचणे, सरपण गोळा करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. लवकरच तेंदुपत्ता संकलनाचे कामसुद्धा प्रारंभ होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ राहण्याची शक्यता असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या मोहफुल वेचणे, सरपण गोळा करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. लवकरच तेंदुपत्ता संकलनाचे कामसुद्धा प्रारंभ होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
उन्हाळ्यात पाणवठ्याजवळ अस्वलांचा हमखास अधिवास राहतो. त्यामुळे जंगलात जाऊन मोहफुल, सरपन व तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हे वनपरिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असल्याने वाघ अन्य प्राण्यांचा सतत संचार सुरू असतो. मोहफुल, सरपण व तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी एकट्या व्यक्तीने जंगलात जाऊ नये. जंगलातील पाणवठे कोरडे होण्याच्या मार्गावर अस आहेत. वन्यप्राणी पाण्यासाठी गावाशेजारीला नाल्यांकडे भटकत आहेत. त्यामुळे शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया सर्व गावातील नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांना वन विभागाच्या वतीने सतत माहिती देण्याची मोहीम सुरू आहे.
जागृती मोहीम
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन जंगलावर अवलंबून असते. जंगल राखण्यात त्यांचेही योगदान मोठे आहे. मात्र, बदलत्या काळानुसार नागरिकांची मानसिकता घडविण्यासाठी वन विभागाकडून जागृती केली जात आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाची काहिली वाढली आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नाले कोरडे पडले. जंगलातील पाणवठे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. शिवणी वन परिक्षेत्रात वनोउपज गोळा करण्याचे काम नागरीक करीत आहेत. याच काळात वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ दबा धरून बसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
- एस.आर. लंगडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय शिवणी