ढाण्या वाघाच्या रस्त्यातच गाडी उभी केली, ताडोबाची दारं कायमची बंद झाली!; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:39 AM2020-02-13T11:39:09+5:302020-02-13T12:16:08+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना एका जिप्सीचालकाने वाघासमोर आपली जिप्सी उभी करीत त्याचा रस्ता अडविला.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना एका जिप्सीचालकाने वाघासमोर आपली जिप्सी उभी करीत त्याचा रस्ता अडविला. यामुळे वाघाच्या मुक्तसंचाराला तर बाधा पोहोचलीच, शिवाय जिप्सीतील पर्यटकांचाही जीव धोक्यात आला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी जिप्सीतील गाईड गवतुरे यांना तत्काळ निलंबित करून पुन्हा ताडोबात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ताडोबा प्रशासनाने तेथील वन्यप्राण्यांचा जिवाला अथवा अधिवासाला धोका पोहोचू नये, पर्यटकांचाही जीव धोक्यात येऊ नये यासाठी विविध नियम व अटी घातल्या आहेत. रविवारी सकाळच्या फेरीत जिप्सी (क्रमांक एमएच ३४ एएम ४०९६) पर्यटकांना घेऊन ताडोबात गेली. दरम्यान, हिलटाप रोडजवळ एक ढाण्या वाघ त्यांना दिसला. जिप्सीचालकाने आगाऊ धाडस दाखवत आपली जिप्सी वाघाच्या समोर उभी केली. वाघ जिप्सीच्या अगदी जवळ आल्यानंतरही हा जिप्सीचालक तिथून हटायला तयार नव्हता. नियमाची पायपल्ली करीत जिप्सी चालकाने दाखवलेल्या आततायीपणामुळे वाघाच्या मुक्तसंचाराला बाधा पोहोचली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तातडीने कारवाई केली.
ताडोबामध्ये जिप्सीचालक वाघाचा रस्ता अडवतो तेव्हा... pic.twitter.com/W1iElUNtJ6
— Lokmat (@MiLOKMAT) February 13, 2020
>या प्रकारानंतर गवतुरे नामक गाईडला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. वाघाची वाट अडविणाऱ्या जिप्सीलाही आता ताडोबा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गाईड आणि जिप्सीचालकाला त्यांची बाजू मांडण्यासाठी गुरुवारी कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे.
- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प