चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाघाचा धुमाकूळ, युवकावर हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 03:04 PM2023-07-10T15:04:52+5:302023-07-10T15:07:00+5:30
वनविभागाने लावले १६ ट्रॅप कॅमेरे
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी व वर्धा जिल्हा सीमेपर्यंत मागील एक महिन्यापासून वाघ गावातील परिसरांत धुमाकूळ घालत आहे. दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील येवती गावाच्या परिसरात हा वाघ नदीकाठावर आढळून आला. त्यानंतर वाघाने एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने परिसरात पिंजरा व १६ कॅमेरे लावले आहेत; परंतु वाघ पिंजऱ्याला हुलकावणी देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरिकांच्या शेतशिवाराजवळ वन कक्ष क्रमांक १७२ हा परिसर आहे. वर्धा जिल्ह्याच्या बाजूने जंगल आहे. मध्यातून एक नदी वाहते. या नदीपरिसरात काही महिन्यांपासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. वाघ पूर्णपणे विकसित असून त्याने जंगली प्राण्यांची शिकार करणे सुरू केले आहे. परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. अनेकांना या वाघाने दर्शन दिले. या नदीकाठावरून हा वाघ वरोरा तालुक्यात येवती गावाच्या शिवारात फिरत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाघ झुडपात होता. नागरिक त्याला हाकलण्याकरिता गेले असता त्याने नागरिकांच्या दिशेने झडप घातली. नागरिकांनी नदीत उड्या घेतल्याने ते बचावल्याची घटना घडली होती.
युवक बचावला
वरोरा तालुक्यातील येवती येथील राजू चिंचोलकर हे शेतात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राजूने जोरदार धूम ठोकल्याने वाघाने जवळ असलेल्या म्हशीवर हल्ला केला.
नागरी, येवती, केळी या परिसरांत नदीच्या बाजूने गस्त घालणे सुरू केले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी.
- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा.