‘त्या’ पट्टेदार वाघाची अनेकांना भूरळ, चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:26 AM2023-05-26T11:26:00+5:302023-05-26T11:29:24+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून सदर वाघ या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे
नागभीड (चंद्रपूर) : तळोधी - बाळापूरदरम्यान गायमुख देवस्थानच्या परिसरात पट्टेदार वाघाचे गुरुवारी अनेकांना दर्शन झाले. या वाघाची चित्रफीत काढून ती व्हायरल करण्यात आली. या वाघाच्या चित्रफितीची अनेकांना भूरळ पडली.
तळोधी - बाळापूरदरम्यान घनदाट जंगल आहे. तसेच परिसरात जलसाठेही भरपूर आहेत. जलसाठे आणि जंगलही घनदाट असल्याने या जंगलात वाघासोबतच इतर प्राणीही भरपूर आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या या जंगलातील तळोधी-बाळापूर या वर्दळीच्या रस्त्याच्या जवळपास ज्याठिकाणी एका प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी गुरूवारी चक्क एक वाघ भ्रमंतीवर आला आणि अनेकांच्या नजरेस पडला.
वाघ दिसताच अनेकांनी या वाघाच्या चित्रफिती काढल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्या. एवढेच नाही, तर अनेकांनी चित्रफीत आपल्या मोबाईलच्या स्टेट्सवरही ठेवली. गेल्या अनेक दिवसांपासून सदर वाघ या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. असे असले तरी या वाघापासून मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती तळोधीचे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर कामडी यांनी दिली.