वाघाची दहशत अन् भयभीत ग्रामीण जनता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:22+5:302021-05-25T04:32:22+5:30
पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या ...
पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी
मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या जंगलात वाघाची दहशत असल्याने ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. या पंधरवडयात वाघाने चारजणांचा बळी घेतला आहे.
ग्रामीण भागातील जनता आपल्या उदरनिर्वाहासाठी सरपणासाठी लाकडे असोत किंवा मोहफूल असो जंगलात जात असतात. वनविभाग वेळोवेळी सावधान करीत असतानादेखील ग्रामीण जनता ऐकण्याच्या मन तीत दिसत नसल्याने मानव व प्राणी संघर्ष निरंतर सुरूच राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने नॉनबफर असलेल्या मूल वनपरिक्षेत्राचे विभाजन करून मूल येथे बफरचे वनपरिक्षेञ कार्यालय निर्माण करण्यात आले; तर नॉनबफरमधील भाग चिचपल्ली वनपरिक्षेत्राला जोडण्यात आला. या दोन्ही वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठया प्रमाणात आहे. तालुक्यातील जानाळा, चिरोली, चिचाळा, दहेगाव, मानकापूर, मारोडा, करवन, काटवन, सोमनाथ आदी बफर व नॉनबफर क्षेत्रात दिवसाढवळया वाघांचे दर्शन होऊ लागले आहे. वाघ कधी रस्त्यावर ठाण मांडून बसलेला आढळून येत आहे, तर कधी शेतात त्याचे पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यामुुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पंधरवड्यात वाघाने चारजणांना हल्ला करून ठार केले आहे. यात कल्पना वाढई (कांतापेेेठ), कीर्तीराम कुुळमेथे (जानाळा), वसंत गेडाम (जानाळा), मनोहर प्रधाने (मारोडा) यांचा समावेश आहे.
बॉक्स
जंगलात जाणे सुरूच
बफर व नॉनबफर वनविभागाच्या जंगलात शेती असल्याने शेतीसाठी जंगलात जावेच लागते. तसेच रोजगार हमीचे काम असो किंवा मोहफुले, सरपणासाठी लाकडे, गुराची चराई असो, जंगलात जाणे आवश्यक आहे. वाघाच्या भीतीने आपला व्यवसायाकडे पाठ फिरविणे शक्य नसल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे असले वाघाचे हल्ले हे होतच राहिले, तर शासनाचादेखील करोडो रुपयांचा निधी यात खर्च तर होईलच; मात्र घरातील कमावता व्यक्तीला गमवावे लागणार आहे. यासाठी शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून मानव व प्राणी संघर्षाला पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.