राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:08+5:30
राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रालगतच्या शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. आतापर्यंत सात शेतकरी व शेतमजुरांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाल्याने शेतावर जाणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.
शेतात जाणाऱ्या नागरिकांना जंगल परिसरात वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. पुन्हा वाघाने शेतकऱ्यांचा जीव जाण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजुरा व विरुर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शेतीची कामे प्रभावित
मागील काही दिवसांपासून राजुरा व विरुर क्षेत्रात वाघाचे दर्शन होत आहे. पोळ्याचा दिवशी दोघांवर वाघाने हल्ला केला होता. तसेच पाळीव जनावरांनाही ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या शेतीतील रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. तसेच कपाशी व सोयाबीन आदी पिकांचे निंदण सुरु असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतावर जात आहेत. मात्र वाघाचे दर्शन होत असल्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली आहे.