बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 05:00 AM2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:33+5:30
केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोहर शेंडे यांची कालवड मारली. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर वन परिक्षेत्रालगत येणाऱ्या बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील पाच महिन्यांत १५च्या वर वाघ आणि बिबट्याने ताव मारला आहे. वाघाच्या दहशतीने केम व येडशीच्या नागरिकांनी वनात जाणे बंद केले आहे, तर उन्हाळल्यातही अंगणात न झोपता रात्री घराची दारे बंद करून झोपावे लागले आहे.
केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोहर शेंडे यांची कालवड मारली. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
बामणीच्या रेल्वे लाईनच्या बाजूने बिबट व वाघाचे येणे सुरूच आहे, तर बामणी नाल्याकडून वाघ दिवसा जंगलात जातो व रात्री नाल्यात बसतो. वनखात्याने लावलेल्या कॅमेऱ्याच्या ट्रॅपमध्ये वाघाच्या हालचालींवर वनखाते लक्ष ठेवून आहे. या परिसरात वाघाचा व बिबट्याचा वावर वाढल्याने मागील तीन महिन्यांपासून वनखात्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व त्यांच्या पथकाने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे. झुडपात वाघ लपून बसू नये यासाठी वनविभागाने दोन दिवसांपासून नाल्याजवळील झुडपे जेसीबीने साफ करणे सुरू केले आहे. वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सतत्या वाघाच्या दर्शनाने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. उन्हाळ्यामध्ये या परिसरातील नागरिक घराबाहेर अंगणात झोपायचे मात्र वाघाच्या भीतीने घरातच झोपावे लागत आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे,
जेव्हापासून या परिसरात वाघ आणि बिबट्याने जनावरे मारणे सुरू केले तेव्हापासून वनविभाग सतत वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे व ग्रामवासीयांना मदत करीत आहे. त्यांचे दररोज सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे.
- सुभाष ताजने, सरपंच,
ग्रामपंचायत, बामणी.