'त्या' वाघाचा मृत्यू विषबाधेने, शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:40 PM2019-08-25T17:40:53+5:302019-08-25T17:41:01+5:30
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) गावालगत शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब पुढे आली आहे.
गोंडपिपरी(चंद्रपूर) : मध्यचांदा वनविभागांतर्गत येणा-या धाबा वनपरिक्षेत्रात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) गावालगत शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब पुढे आली आहे. वाघाच्या मृतदेहापासून २०० मीटर अंतरावर एक डुक्कर मृतावस्थेत पडून होते. तसेच त्याच्याजवळ विषारी औषधही आढळून आले. या आधारे वाघाचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्रीऐवजी रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूने घटनास्थळीच वाघाचे शवविच्छेदन केले. यानंतर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोडसा (जुना) येथील संतोष चनकापुरे यांच्या शेतात शनिवारी रात्री पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर तर्कवितकांना उधान आले होते. दरम्यान, वनविभागाच्या वतीने मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू आहे. अशातच वाघाचा ज्या जागेवर मृत्यू झाला. त्यापासून साधारणत: २०० मिटर अंतरावर एक डुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्याच्याजवळ विषारी औषध आढळून आले. यावेळी चंद्रपूर वनवृताचे मुख्य वनसरंक्षक रामाराव, मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहाय्यक उपवनसंरक्षक विवेक मोरे, धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
वाघ नेमका कुठचा?
घटनास्थळापासून सभोवताल ५ - ५ किलोमीटरवर जंगल नाही. दूरवर शेती लागून आहे. अशावेळी हा वाघ नेमका आला कुठून, शेजारीच डुकराचा मृत्यू कशाने झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. जंगल नसलेल्या परिसरात वाघ आल्याने शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.