मानवी वाघांकडून वाघांचे प्रदर्शन
By admin | Published: July 29, 2016 01:02 AM2016-07-29T01:02:53+5:302016-07-29T01:02:53+5:30
वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे.
वसंत खेडेकर बल्लारपूर
वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे. वाघ म्हणजे जिवाला भीतीच ! त्यामुळे वाघ समोर दिसला वा त्याचे नाव घेतले तरी पाचावर धरण बसते. तो पिंजऱ्याच्या आत असला की, त्याची काही भीती नाही. सर्कशीतील पिंजऱ्यात तो जेरबंद असला तरी त्याला जवळून निरखून बघता येते. तसेच, सर्कशीच्या खेळात, खेळाच्या रिंगणात त्याला आपण मोकळे बघतो. ते बघत असताना, चवताळून रिंगणाबाहेरुन तो प्रेक्षकांमध्ये घुसला तर, या कल्पनेने आपण पार घाबरुन जातो. (आता, सर्कशीत वाघावर बंदी आली आहे.) त्यामुळे वाघाला प्रत्यक्ष बघायचे असल्यास व्याघ्र प्रकल्पातच जावे लागते. अर्थात हे साऱ्यांना शक्य नाही. पण, वाघाचे आकर्षण सदा सर्वकाळ सर्वांच्या मनात असतेच !
या आकर्षणापायीच असावे, माणूस वाघ बनतो. वाघासारखा साज आपल्या अंगावर चढवतो आणि आपले पूर्ण शरीर वाघासारख्या रंगांनी रंगवितो. त्याद्वारे वाघाचे दर्शन लोकांना घडवित असतो. या मानवी वाघाला ‘परत वाघ’ असे म्हटले जाते. परत वाघ हा लहान-मोठ्यांचा लाडका आणि आकर्षणाचा बिंदू ! मानवी वाघ बनणे व ऐटदार पैतरे टाकत धडाकेबाज आणि विशिष्ट प्रकारच्या वाघांच्या तालावर नाचणे हा प्रकार भोसले काळापासून सुरू झाला, असे सांगतात. तेव्हापासून तर आजतागायत विदर्भात ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सव, मोहरम, शारदा- दुर्गा उत्सवात वाघ बनून नाचायला उधाण येते. वाघाला शोभावी अशी भरदार अंगकाठी, चेहरा तेज असला, की असे परत वाघ डोळ्यांची पारणे फेडतात. परत वाघ बनणे सोपे नाही. ज्याला तो वाघ बनायचे असेल त्याला पाय, हात व छातीवरील केस काढावे लागतात. त्यानंतर अंगभर पांढऱ्या रंगाचा पेंट लावला जातो. तो रंग सुकण्याची वाट बघावी लागते. त्यावर वाघासारखे पिवळे, काळे पट्टे फिरविले जातात. डोक्यावर वाघाचा विशिष्ट टोप आणि भरदार मिशांचा सेट चेहऱ्यावर फिट केला जातो. सोबतच कमरेभोवती वाघासारखी झुपकेदार शेपटी! या साऱ्या कठीण प्रक्रियेनंतर मानवी वाघ सजतो. रंग उडू नये, टोप व मिश्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या पेहरावात त्याला सांभाळावी लागते. मानवी वाघ पेंटर रंगवितात. वाघ रंगविणारे काही खास पेंटर आहेत. त्यांच्याकडे जावे लागते. बल्लारपूर व चंद्रपूरला मोजकेच तसे पेंटर आहेत. मानवी वाघाचा प्रकार मुंबईकडे नाही. याची माहिती मुंबईकरांना व्हावी, याकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील तिघांना परत वाघ बनवून मुंबईला गतवर्षी नेले होते. व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी बल्लारपूर येथील या तिघा मानवी वाघांच्या तालावर नृत्य केले. हा नाविण्यपूर्ण प्रकार बघून मुंबईकर व अमिताभ बच्चन प्रभावित आणि खूश झाले. अमिताभ मंचावरुन खाली उतरुन मानवी वाघांची माहिती त्यांच्याकडून घेत ते त्यांच्यासोबत चांगले २० मिनिटे रमत राहिलेत. असे आहे मानवी परत वाघाचे आकर्षण !