चंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरण; निर्णयावर एकमत न झाल्यानेच गेले वाघाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:11 AM2019-11-09T11:11:58+5:302019-11-09T11:12:23+5:30
शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
विनायक येसेकर
चंद्रपूर : चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. यात बराच कालावधी निघून गेला आणि यातच जखमी वाघाचा मृत्यू झाल्याचे आता बोलले जात आहे.
शिरणा नदीच्या पात्रात पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर, विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या पाठोपाठ सीसीएफ रामाराव, पशु वैद्यकीय अधिकारी रविकांत खोबरागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे घटनास्थळी उपस्थित झाले. सकाळी ८ वाजतापासून त्या जखमी वाघाला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असताना वरिष्ठ वनाधिकारी हे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेत होते. त्या सल्ल्यानुसार रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला असता यात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी अडथळा निर्माण करीत होते. या तीनही चमूचे कोणत्याच निर्णयावर एकमत होत नव्हते. यात वेळ निघून गेली आणि रात्री १ वाजता जखमी वाघाचा मृत्यू झाला. आता प्रत्येकजण एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
पट्टेदार वाघ शिरणा नदीच्या पात्रात पडल्याने त्या पात्रात पाणी अधिक होते. त्या पात्रात उतरण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्यात आला. त्या वाघाला जिवंत बाहेर काढण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे, पिंजऱ्यात अडविणे व जाळ टाकून बाहेर काढणे या तीन सुविधा उपलब्ध होत्या. परंतु तो वाघ जखमी अवस्थेत पाण्यात असल्याने बेशुद्ध करणे, जाळ्यात अडकवणे रेस्क्यू ऑपरेशनमधील काही जणांना शक्य वाटले नाही. त्यामुळे वाघाला पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाघ गंभीर जखमी असल्याने हा प्रयत्नही विफल झाला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी वाघाला वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न चालविले नाही.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधींचा अडथळा
या घटनेबाबत एका वन अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जखमी झालेल्या त्या पट्टेदार वाघाला आम्ही बाहेर काढण्यास अनुभवानुसार समर्थ होतो. आम्ही रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु आम्ही केलेले ऑपरेशन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधीनी योग्य नसल्याचे सांगून आमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मानवी सानिध्यातच होता वाघ
या पट्टेदार वाघाचा जन्म २०१५ मध्ये जेना पहाडीवर झाला. वाघिणीने नर व मादी अशा दोन बछड्यांना जन्म दिला. पुढे मादी ही पावणा जंगल शिवारात गेली तर नर वाघ भद्रावती वनपरिक्षेत्र सोडून मानवाच्या सान्निध्यात राहिला. तो सुरुवातीला पद्मावार वाडी, गोरजा, चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा, देऊरवाडा अशा गावालगतच त्याचे वास्तव्य होते. अनेक पाळीव प्राण्यांवर त्याने हल्लेही केले.