वाघांवर २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह २५ पीआरटी सदस्यांची नजर; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय

By परिमल डोहणे | Published: August 29, 2023 02:34 PM2023-08-29T14:34:55+5:302023-08-29T14:35:34+5:30

वाघांच्या हालचाली टिपणार

Tigers monitored by 25 PRT members with 20 trap cameras; Measures to prevent human wildlife conflict | वाघांवर २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह २५ पीआरटी सदस्यांची नजर; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय

वाघांवर २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह २५ पीआरटी सदस्यांची नजर; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय

googlenewsNext

चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोहर्ली वनपरिक्षेत्र ॲक्शन मोडवर आले आहे. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची २५ सदस्यीय पीआरटी चमू शेत शिवार परिसरात डोळ्यांत तेल टाकून नजर ठेवणार आहे. तर परिसरात २९ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मोहर्ली वनपरिक्षेतांतर्गत येणाऱ्या परिसरात वाघासह हिंस्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. २५ ऑगस्ट रोजी एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या अनुषंगाने उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची २५ सदस्यीय पीआरटी चमू तैनात केली आहे. तसेच परिसरात २९ ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच गावागावांत जनजागृती करीत बोर्ड आणि बॅनर लावण्यात आले. वन्य प्राण्यांपासून सावधगिरीबाबत ऑडिओ क्लिप तयार करून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समिती गठित करण्यात आली असून, समितीने केलेल्या उपाययोजना अवलंबिल्या जात आहेत. या उपक्रमातून मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होईल, असा विश्वास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना मुखवट्यांचे वितरण

शेतकरी शेतात काम करताना अनेकदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. यावर मोहर्ली प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. वनपरिक्षेत्र मोहर्ली अंतर्गत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मुखवट्यांचे वितरण करण्यात आले आहे. शेतात काम करताना हे शेतकरी मुखवटा आपल्या डोक्याच्या मागे लावणार आहेत. त्यामुळे वन्य प्राणी त्यांच्याजवळ फिरकणार नाहीत तसेच त्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे आणि पर्यायाने नागरिकांना सुरक्षा प्रदान व्हावी, यासाठी मोहर्ली वनपरिक्षेत्रामार्फत शेतकऱ्यांना वनालगतच्या क्षेत्रात वावरताना हिंस्र वन्य प्राण्यांपासून सुरक्षा प्रदान करण्यासाठी मानवी मुखवट्यांचे वितरण करण्यात आले आहे. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी २० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच २५ पीआरटी सदस्यांची चमूही लक्ष ठेवून आहे.

- संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर)

मृतकाच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथील लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) यांच्यावर २५ ऑगस्ट रोजी शेतात काम करताना वाघाने हल्ला करून ठार केले. वनविभागाने तत्काळ कार्यवाही करून मृतकाचे वारस पती रामराव जगन्नाथ कन्नाके यांच्या बँक खात्यात १० लाख रुपये अदा करून मृतकाचे सर्व वारस यांच्या बँक खात्यात उर्वरित १५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट जमा करण्याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी पुढाकार घेऊन वारसांना तत्काळ मदत मिळवून दिली.

Web Title: Tigers monitored by 25 PRT members with 20 trap cameras; Measures to prevent human wildlife conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.