शिवणी परिसरात वाघाची दहशत
By admin | Published: January 23, 2017 12:39 AM2017-01-23T00:39:04+5:302017-01-23T00:39:04+5:30
बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत पसरलेली असून...
वनविभागाकडून इशारा : जंगलात जाणे टाळावे
वासेरा : बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत पसरलेली असून नागरिकांनी जंगलात सरपण किंवा इतर कामाकरिता जाणे टाळावे व आपले संरक्षण करावे, असे आवाहन शिवणी वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी एस.आर. लंगडे यांनी केले आहे.
बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील पंधरा दिवसात चक बामणी येथील महिला व शिवणी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. तसेच जामसाळा येथील एक नागरिक अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला. या घटना ताज्या असल्याने शिवणी वनपरिक्षेत्रातील कुणीही जंगलात जाऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. लंगडे यांनी आवाहन केले आहे.
सध्या गावाशेजारच्या वनक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वलाचा वावर सुरू आहे. तसेच जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात वन्यप्राण्याचा वावर असल्याने कुणीही एकटयाने न जाता स्वत:च्या हातात काही घेऊन समुहाने जावे. गुराख्याने आपली जनावरे दाट जंगलात नेऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन एस.आर. लंगडे वनाधिकारी यांनी केले आहे. (वार्ताहर)