नदी परिसरातील झुडपात वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:34 PM2018-06-29T23:34:00+5:302018-06-29T23:34:24+5:30
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिरापर्यंत वाढ झुडूपातच ठाण मांडून होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिरापर्यंत वाढ झुडूपातच ठाण मांडून होता.
सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र वाघाची दहशत पसरली आहे. नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले असून वाघावर पाळत ठेवून आहेत. असे असताना शुक्रवारी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथील गजानन वसाके शेतात गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी ही माहिती वनविभाग व गावकºयांना दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. झुडुपात बसलेल्या वाघाला हुसकावून लावण्यासाठी फटाके फोडण्यात आले. मात्र वाघाने जागा सोडली नाही. हळूहळू बघ्यांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे सिंदेवाही पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले.
मात्र वाघ दिवसभर झुडुपातच लपून बसलेला होता. दिवसभर परिसरात शेतावर नागरिक असल्याने त्याला हुसकावून लावणे कठीण असल्याने सायंकाळी वाघाला हुसकावून लावण्यात येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वाघ लपून बसलेला आहे, तेथून चिखलमिनघरी गाव ४०० ते ५०० मिटर अंतरावर तर पलीकडे भेंडाळा गाव आहे.