वाघांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे ताडोबातील पर्यटकांमध्ये कुतूहलपूर्ण चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:32 PM2018-03-16T14:32:56+5:302018-03-16T14:33:04+5:30
मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : व्याघ्र दर्शनाची इच्छा झाली की विदर्भातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डोळ्यासमोर उभा राहतो. दररोज ताडोबासाठी पर्यटकांची रिघ लागलेली असते. याचेच हे द्योतक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाशिवायही वाघाचे दर्शन केव्हा कुठे होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. हा व्हिडिओे बघितल्यास तो चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे हे स्पष्ट होते. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते.
एक मिनी ट्रॅव्हल्स गुळगुळीत डांबरी रस्त्याने जात असताना चालकाचे अचानक पुढ्यात असलेल्या वाघांवर लक्ष जाते. यानंतर तो तिथेच ट्रॅव्हल्स थांबवितो. बघतो तर एक दोन नव्हे, तर तब्बल चार वाघ ऐटित ट्रॅव्हल्सकडे येत आहेत. हे बघून ट्रॅव्हल्समधील एका प्रवाश्याने आपल्या मोबाईलद्वारे वाघाचे चित्रिकरण सुरू केले. हे चित्रिकरण अनेक व्हॉट्सअॅप ग्रूपवर व्हायरल झाले आहे. चित्रिकरण बघितल्यास ते चारही वाघ एकापाठोपाठ ट्रॅव्हल्सच्या दिशेने येत आहेत. ते अगदी ट्रॅव्हल्सच्या बाजूने पुढे निघून जातात. ट्रॅव्हल्समधील मंडळीही अतिशय जवळून मनसोक्तपणे व्याघ्र दर्शन घेतात. यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. हा व्हिडिओे समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून अनेकांना या वाघाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. एकाचवेळी चार वाघ तेही ताडोबाव्यतिरिक्त यामुळे अनेकजण हा परिसर कोणता आहे याची विचारपूस करताना दिसून येत आहे. काहींनी तर चंद्रपूर-मूल मार्गावर हे व्याघ्र दर्शन झाल्याची कमेंट्स पोस्ट केली आहे. त्या ट्रॅव्हल्समधून चित्रिकरण करताना गाडीत असलेले पॉलिथीन त्यात आले आहे. त्यावर वरोरा असे लिहिलेले आहे. यावरून हे वाघ चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे, हे स्पष्ट होते. मात्र तो रस्ता नेमका कोणता ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.