रेल्वे अपघातात तीन बछडे गमावलेल्या ‘त्या’ वाघिणीचा चौथा बछडा जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:56 PM2018-11-20T12:56:12+5:302018-11-20T12:58:28+5:30
तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेली वाघीण सोमवारी एका बछड्यासोबत आढळली.
चंद्रपूर : तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेली वाघीण सोमवारी एका बछड्यासोबत आढळली. हा तिचा चौथा बछडा असून तो जिवंत असल्याने वनविभाग व वन्यजीवप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. वाघिणी आपल्या बछड्यासह दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविकास महामंडळाचे विभागीय प्रबंधक पी. आर. धावडा यांनी या घटनेला दुजोरा दिला.
गुरुवारी सकाळी वाघाचे तीन बछडे जुनोना जंगलातील लोहारा-चिचपल्ली परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. यानंतर त्या बछड्याची आई त्याच परिसरात असल्याने वनविभागाने घटनास्थळ परिसरात तब्बल २० कॅमेरे लावून गस्त ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी त्या कॅमेऱ्यात एक वाघीण कैद झाली होती. ती आता आपल्या बछड्याविना असल्याचे बोलले जात होते. अशातच आज त्या कॅमेऱ्यात एक वाघीण आपल्या बछड्यासह कैद झाल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. त्या छायाचित्रावर मामला वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक ४१०, दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी २ वाजून ११ मिनिटांची वेळ नमुद झालेली आहे. यावरून तीन बछड्यांना मुकलेली हीच ती वाघीण असून तिला चवथा बछडा होता आणि तो सुखरूप असल्याचे छायाचित्रावरून दिसून येते.