वाघिणीने एक तास अडविला नागभीड-ब्रह्मपुरी मार्ग; दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:34 PM2023-01-04T12:34:56+5:302023-01-04T12:37:43+5:30
वाघिणीसोबत बछड्यांचाही मुक्त संचार : तासभर वाहतूक खोळंबली
दत्तात्रय दलाल
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : सायगाटा जंगल परिसरात वाघिणीने बछड्यांना जन्म दिला असून रस्ता पार करताना अनेकांनी तिघांना बघितले. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वाघीण रस्ता पार करून वारंवार जात होती. तर तिच्या मागे बछडे ये - जा करीत होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागली होती. तब्बल अर्धा - पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली. वनविभाग तसेच पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ट्रॅकरच्या सहाय्याने वनविभागाने वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
ब्रम्हपुरीपासून अवघ्या पाच किमी अंतरावरील सायगाटा परिसर जंगलाने व्यापला आहे. याच परिसरात एका इसमाचा बळी गेला होता. तेव्हापासून मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता कठडे लावून बंद करण्यात आला आहे. या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. सध्या या परिसरात अस्वल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आज वाघीण बछड्यांसह रस्ता पार करताना दिसून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. वनविभागाला माहिती मिळताच रस्त्यावर गस्त वाढविण्यात आली. कोणतीही जीवित हनी होऊ नये यासाठी पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी तब्बल तासभर वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.
दुचाकी चालकाची वाघिणीला धडक
सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान दुचाकी चालक ब्रम्हपुरीकडे येत असताना वाघीण बछड्याला तोंडात पकडून रस्ता पार करत होती. अचानक समोर आल्याने दुचाकीची वाघिणीच्या मागील पायाला धडक बसली. यात दुचाकी चालक खाली पडला. मात्र, बछडा असल्याने वाघीण जंगलात निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.
टोल नाका चालकाची मग्रुरी
सायंकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. तब्बल अर्धा - पाऊण तासाने ही वाहतूक सुरू झाली. यावेळी गर्दी पाहून टोल चालकाने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू ठेवणे आवश्यक होते. मात्र, एकच बाजू सुरू ठेवल्याने नाक्यावर देखील वाहनांची मोठी रांग लागली होती.