शेतातील जिवंत वीज तारांमध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:02 AM2023-02-07T11:02:09+5:302023-02-07T11:02:40+5:30

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या शेतशिवारातील घटना

Tigress dies after being entangled in live power lines in farm | शेतातील जिवंत वीज तारांमध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू

शेतातील जिवंत वीज तारांमध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू

googlenewsNext

घोसरी (चंद्रपूर) : शेतातील पिकांचा डुकरांपासून बचाव करण्याच्या हेतूने जिवंत विद्युत प्रवाह लावलेल्या तारांमध्ये अडकून पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाला. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव (घोसरी) शेतशिवारात सोमवारी ही घटना उघडकीस आली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत घोसरी उपवन क्षेत्रातील नांदगाव येथील अरुण माशीरकर यांच्या मालकीचे शेत घोसरी येथील पुणेश मारोती नाहगमकर हे ठेक्याने करीत आहेत. त्यांनी शेतातील हरभरा पिकाचा डुकरांच्या हैदोसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतात रात्रीला विद्युत प्रवाह सुरू केला होता. परंतु, या विद्युत प्रवाहात अडकल्याने वाघिणीचा नाहक बळी गेला. ही घटना रविवारी सायंकाळी घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकरी पुणेश मारोती नाहगमकर यांनी विद्युत प्रवाहात वाघिणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच ते गडबडले. त्यांनी मृत वाघिणीवर तणीस टाकून ठेवले होते. परंतु, या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत प्राथमिक चौकशीवरून शवविच्छेदनासाठी पोंभुर्णा येथे पाठविण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पुणेश यांचा मुलगा अंकुल नाहगमकर याने विद्युत प्रवाह सोडल्याचे लक्षात येताच वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांनी दिली.

वाघीण शिकार झाली, त्या बछड्यांचे काय?

घोसरी उपवन क्षेत्रात मागील महिनाभरापासून वाघीण व तिच्या दोन बछड्यांचा वावर असल्याने शेतकरी भयभीत होऊन शेतातील कामे प्रभावित झाली होती. त्यामुळे परिसरातील चेक फुटाणा येथील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्याने वनविभागाने पिंजरे लावले होते. परंतु, वनविभागाला अपयश आले होते. ही मृत वाघीण चेक फुटाणा शिवारातील असेल तर त्या बछड्यांचे काय, हा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Tigress dies after being entangled in live power lines in farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.