चार बछड्यांसह वाघिण महिनाभरापासून ताडोबा क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:49 PM2018-08-25T13:49:55+5:302018-08-25T13:53:29+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील छोटा नागपूर, विचोडा व विचोडा(बु.) परिसरात एका वाघिणीने चार बछड्यांसह तब्बल महिनाभरापासून ठाण मांडले आहे.

Tigress is Out of Tadoba area with four cubs, since one month | चार बछड्यांसह वाघिण महिनाभरापासून ताडोबा क्षेत्राबाहेर

चार बछड्यांसह वाघिण महिनाभरापासून ताडोबा क्षेत्राबाहेर

Next
ठळक मुद्देवनविभाग चिंतेतसुरक्षेसाठी उपाययोजनांवर भर

राजेश भोजेकर
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील छोटा नागपूर, विचोडा व विचोडा(बु.) परिसरात एका वाघिणीने चार बछड्यांसह तब्बल महिनाभरापासून ठाण मांडले आहे. वाघिणीला जंगलात हुसकावून लावण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आले नाही. परिणामी वनविभागाने या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देणे सुरू केले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर आवंडा धरणाच्या परिसरात महिनाभरापूर्वी चार बछड्यांसह एक वाघीण दिसली होती. या भागात छोटा नागपूर, विचोडा व विचोडा बुज. गावांचा शिवार आहे. तेव्हापासून संबंधित गावकऱ्यांमध्ये वाघिणीची दहशत निर्माण झालेली आहे. वनविभागाने वाघिणीला हुसकावून लावण्यासाठी अनेक युक्त्या लढविल्या. मात्र वाघीण या परिसरातून अद्यापही गेलेली नाही. अखेर वनविभागाने या भागातील नागरिकांना तसेच वाघीण व तिच्या बछड्यांना धोका होऊ नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मचाणीवर दिवसरात्र पहारा
वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी वनविभागाने या परिसरात मचाण उभारली आहे. या मचाणीवरून दिवसरात्र पहारा देणे सुरू आहे. सोबतच परिसरात रात्रीला स्ट्राँग लाईटचा प्रकाश देण्यात आला आहे. या वाघिणीने अद्याप कुणालाही इजा पोहचविली नाही हे विशेष.

गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फलक
संबंधित गावकऱ्यांना सतर्क ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात फलक लावले आहेत. शेतात जाताना झाडीजवळ, नाल्याजवळ वन्यप्राणी लपून बसलेले असू शकते. धोकादायक वन्यप्राणी दिसल्यास जोरजाराने ओरडावे. परिसरातील लोकांनी सतर्क करावे. रिकामे डबे वाजवून आवाज करावा. रात्री शेतात शेकोटी पेटवावी. टार्चचा वापर करावा. असा जागर या फलकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

२५ कॅमेरा ट्रॅप
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) यांच्याकडून २५ कॅमेरा ट्रॅप वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) चंद्रपूर यांना प्राप्त झाले आहेत. योग्य ठिकाणी लावण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

नाले व रस्त्याच्या बाजूला सोलर कुंपण
परिसरात नाले व रस्त्याच्या बाजुच्या सोलर कुंपण लावण्यात येणार आहे. मात्र पाऊस असल्याने ही कामे खोळंबली आहे. लवकरच परिसरात साफसफाई करून ही कामे करण्यात येणार असल्याचे वनविभाचे म्हणणे आहे.

सीटीपीएसलाही सूचना
वाघाच्या संनियत्रणाकरिता मंचाण उभारण्यात आले असून बायनाकुलरद्वारे तपास घेऊन वनप्राण्यांच्या नोंदी घेण्याच्या सूचना अधिनस्त कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. सीटीपीएसलाही चोख नियंत्रण ठेवून वाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाघिणीचा चार बछड्यांसह परिसरात वावर आहे. गावकऱ्यांना सदैव सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मचाणीवर दिवसरात्र निगराणी ठेवली जात आहे. गावकरी व वाघिणीला इजा होऊ नये म्हणून या भागात सोलर कंपुण उभारण्यात येणार आहे. महिनाभरापासून येथील परिस्थितीवर वनविभाग नियंत्रण ठेवून आहे.
- संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादे.) चंद्रपूर

Web Title: Tigress is Out of Tadoba area with four cubs, since one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ