नळाला लावले टिल्लू पंप, पाण्याची कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:36+5:302021-05-25T04:32:36+5:30
देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा ...
देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून ५० हजार लीटरचे एक जलकुंभ बांधण्यात आले. या जलकुंभाच्या मदतीने संपूर्ण देवाडा गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. शिवाय काही भाग चढउतार असल्याने सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काही ठिकाणी वॉल्व्ह बसविले आहेत. तरीसुद्धा गावातील काही लोक स्वतःच्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढत असल्याने इतर भागात पिण्याचे पाणीही मिळत नाही. ही बाब प्रत्येक वार्डात जास्त प्रमाणात वाढत असल्याने सर्व वार्डातील महिलांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. मात्र, या बाबतीत ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसांच्या आत सदर टिल्लू पंप लावत असलेल्या नागरिकांवर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा महिला व नागरिकांनी दिला आहे.