काळानुरूप बदलली निकालाची पद्धत
By admin | Published: June 18, 2014 12:07 AM2014-06-18T00:07:53+5:302014-06-18T00:07:53+5:30
विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.
वसंत खेडेकर - बल्लारपूर
विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.
दहावीचे महत्त्व पन्नास वर्षांपूर्वी होते तेवढेच आजही आहे. फक्त दहावीच्या निकालाच्या पद्धती बदलल्या आहेत एवढंच. पूर्वी म्हणजे ३५-४० वर्षांपूर्वी दहावीचा निकाल आधी वर्तमानपत्रात यायचा. त्यानंतर शाळांमधून गुणपत्रिका मिळत असत. सर्व मराठी, हिन्दी व इंग्रजी वृत्तपत्र निकाल व संबंधित वृत्तपत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोंनी भरलेले असायचे. निकालाच्या दिवशी नागपूरचे पेपर कधी एकदाचे आपल्या गावी येणार, याची दहावीचे विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत. गावातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गाड्यांमधून पेपरचे बंडल उतरले की, पेपर विकत घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पेपर विक्रेत्यांवर उड्या पडायच्या. त्यात मग पेपर विक्रेता एक रुपयाचा पेपर दोन-तीन रुपयांत विकून हात धुऊन घ्यायचा. पेपरमध्ये जिल्हावार गावाचे, विद्यालयाचे नाव, त्याखाली उत्तीर्ण विद्यार्थ्याचे प्रथम नावासोबत आडनाव आणि कंसात त्याला मिळालेले गुण, तसेच श्रेणी असे सविस्तर येत असे. एकदा निकाल डोळ्यांसमोरून गेला, उत्तीर्णांमध्ये आपले नाव बघितले की उत्तीर्ण विद्यार्थी जाम खुश होऊन पेढे वाटायचे. त्याच पेपरमध्ये मेरीटची सूची प्रसिद्ध व्हायची.
त्याकाळी बहुदा नागपूर, अमरावती, अकोला, उमरेड, सावनेर याकडील विद्यार्थीच विदर्भातून प्रथम येत. मेरिटमध्ये नागपूरच्या हडस विद्यालयाचे विद्यार्थी अधिक चमकत असत. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी हमखास मेरिटमध्ये असायचेच. पेपरमध्ये आपले नाव बघितल्यानंतर ते विद्यार्थी तो पेपर जपून ठेवायचे. नंतर नावासह निकाल येणे बंद होऊन फक्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रोलनंबर व त्यांना मिळालेले गुण एवढेच येऊ लागले.
मेरिट सूची येणे सुरूच होते. त्यानंतर पेपरमधून निकाल येणे बंद झाले. निकालाची तारीख पेपरमधून आली की, त्या दिवशी जिल्ह्याच्या मुख्यालयी गुणपत्रिका यायच्या. शाळांनी ते तेथून आणायचे आणि दिलेल्या वेळेवर गठ्ठा उघडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटायच्या. निकाल बघण्याकरिता शाळांमध्ये विद्यार्थी गर्दी करत.
कोण प्रथम आला ते जाणून घेत. एकमेकांची माहिती मिळाल्याने मजा यायची. इंटरनेट पद्धती आली आणि जुने सारेच गेले. आपापले निकाल इंटरनेटवर बघा आणि आपल्यातच आनंद व दु:ख मानत बसा, या एकलकोंड्या पद्धतीने गावातून, जिल्ह्यातून कोण विद्यार्थी प्रथम आला हे कळतच नाही. हल्ली तर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ही निकाल बघतेवेळी इंटरनेटवर अंकित होणे गरजेचे झाले आहे. तरच निकाल बाहेर येईल अन्यथा नाही. याच कारणाने बारावीचा निकाल महाविद्यालयांना निकालाच्या दिवशी बघता आला नाही.
दहावीचा निकाल बघताना विद्यालयांनाही तोच पेच पडला. काळानुरूप बदललेल्या आधुनिक पद्धतींमुळे निकालाची पूर्वीची मजाच पार गेली आहे.