पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:02 AM2018-03-30T01:02:29+5:302018-03-30T01:02:29+5:30
येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे.
संघरक्षित तावाडे।
ऑनलाईन लोकमत
जिवती : येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. मात्र आता नाल्याच्या खड्ड्यातीलही पाणी पूर्णत: आटले असून ग्लासने पाणी घागरमध्ये भरावे लागते. परिणामी पाणी समस्येने त्रस्त सुमारे २० कुटुंबांनी आतापर्यंत गाव सोडले आहे.
शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत घनपठार ही ६० घरांची वस्ती आहे. येथील तिनशेच्यावर लोकसंख्या असून गावात दरवर्षीच पाणी समस्या निर्माण होत असते. दिवाळीनंतर पाणी टंचाई जाणवू लागते. मात्र प्रशासनाकडून या गावासाठी आजपर्यंत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या गावासाठी दीड किमी अंतरावरील नाल्यावर टाकीचे बांधकाम करून नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. नळयोजना सुरळीत होती, तोपर्यंत येथे पाणी टंचाई उद्भवत नव्हती. मात्र सात वर्षांपूर्वी टाकीला जागोजागी भगदाड पडून टाकी फुटली. त्यामुळे ही नळयोजनाच बंद पडली व गाव पाण्याच्या भीषण टंचाईच्या सावटाखाली गेले.
टाकी दुरुस्तीसाठी आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही.
प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट देवून वस्तूस्थिती जाणून घेतली असता, संपूर्ण गावात भीषण पाणी टंचाई आहे. नाल्यातील गढूळ पाणी ग्लासने काढून घागर भरली जाते. या समस्येला त्रस्त होवून आम्हाला गाव सोडून स्थलांतरीत व्हावे लागत आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.