सव्वा कोटींचा करमणूक कर थकीत
By admin | Published: December 31, 2014 11:21 PM2014-12-31T23:21:40+5:302014-12-31T23:21:40+5:30
मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे
४३२ केबल आॅपरेटर : नोटीस बजावूनही करमणूक कर भरण्यास दुर्लक्ष
चंद्रपूर : मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ४३२ केबल आॅपरेटरकडे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा कर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
कर भरण्यासाठी केबल आॅपरेटरना जिल्हा करमणूक विभागाने नोटीस बजावले आहेत. मात्र, या नोटीसांना न जुमानता कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. राज्य शासनाकडून चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचे करमणूक कर वसूल करण्याचे उद्दीष्ट दिले. यापैकी २ कोटी ६५ लाख ७९ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात ४३२ केबल आॅपरेटर आहेत. या केबल आॅपरेटरकडे ९९ हजार १९४ ग्राहक आहेत. तर ३३ हजार ८१३ हे डीटीएच जोडणीचे ग्राहक आहेत. ग्राहकांकडून नियमीत शुल्क घेऊनही केबल आॅपरेटर मात्र करमणूक विभागाकडे कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. कर थकीत ठेवणाऱ्यांमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे करमणूक विभागाचे अधिकारीही कर थकीत ठेवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता केवळ त्यांना नोटीस बजावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आॅपरेटरची मनमानी सुरु आहे. (स्थानिक प्रतिनिधी)